IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पुन्हा महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) कर्णधारपदी परतला अन् चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंचा फॉर्मही परतला. ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) घरच्या मैदानावर डरकाळी फोडली आणि त्यासमोर सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. वेगाचा बादशाह उम्रान मलिक ( Umran Malik) याचे चेंडू अगदी सहजतेने ऋतुराज व डेवॉन कॉनवे टोलावताना दिसले. चेंडूच्या गतीला केवळ दिशा देण्याचं काम या दोघांनी केलं अन् ही फटकेबाजी पाहून डोळ्यांचे पारणे फेडले... ऋतुराजचे शतक १ धावेने हुकल्याने CSK फॅन्स निराश झाले. हैदराबादच्या खेळाडूंनी ऋतुराजचे कौतुक करताना त्याची पाट थोपटली. आयपीएलमध्ये १ धावेने शतक हुकणारा तो पाचवा खेळाडू ठरला.
ऋतुराज व डेवॉन कॉनवे यांनी CSK च्या डावाची दणक्यात सुरुवात केली. कॉनवे नुकताच विवाह बंधनात अडकला अन् सुट्टी संपवून पुन्हा भारतात दाखल झाला. ज्या उम्रान मलिकच्या वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण केले होते. त्याला आज ऋतुराजने सहज झोडले. मलिकने टाकलेल्या वेगवान चेंडूला योग्य दिशा देण्याचं काम फक्त ऋतुराजने केले. त्यामुळे त्याचे फकटे सहज सुंदर दिसत होते. ऋतुराजने ३८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी करताना कॉनवेसह ( २९) पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ऋतुराजने आज आयपीएलमध्ये १००० + धावांचा पल्लाही ओलांडला. त्याने यासाठी केवळ ३१ इनिंग्ज खेळल्या. आयपीएल इतिहासात सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी ऋतुराजने बरोबरी केली.