IPL 2022 DC vs CSK Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला... संघाचा नेट गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे सर्व खेळाडूंना आपापल्या खोलीत विलगिकरणात जाण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आज नवी मंबईत होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीवर अनिश्चिततेचं सावट आलं आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अन्य खेळाडूंची पुन्हा RT-PCR चाचणी करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट आता समोर आला आहे.
२० एप्रिल रोजी दिल्ली संघात कोरोनाचे काही रुग्ण आढळले होते. संघातील कोरोना पॉझिटिव्हची ही आठवी घटना आहे. याआधी, फिजिओ पॅट्रिक फरहार्ट, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श आणि न्यूझीलंडचा यष्टिरक्षक टिम सेफर्ट यांच्यासह स्टाफ सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या कुटुंबातील सदस्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला अन् पाँटिंगला क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते.
पण, आता हाती आलेल्या रिपोर्ट नुसार दिल्लीच्या अन्य खेळाडूंची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा आजचा सामना होणार आहे. ''दिल्ली कॅपिटल्सच्या अन्य सर्व खेलाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि त्यांना आजचा सामना खेळण्याची परवानगी दिली गेली आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी InsideSport ला सांगितले.
रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने गुरूवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादवर २१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्ली १० गुणांसह पाचव्या क्रमांकवर आहे आणि त्यांचा नेट रन रेट ०.६४१ हा इतरांपेक्षा चांगला आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. दोन सामने जिंकून त्यांच्या खात्यात १४ गुण होतील, पण त्यानंतर नेट रन रेटवर त्यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के होईल. दिल्लीला उर्वरित चार लढतीत चेन्नई, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स व मुंबई इंडियन्स यांचा सामना करायचा आहे.