IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स सहज विजय मिळवतील असे वाटत होते. पण, उमेश यादवने ( Umesh Yadav) दिल्लीला तीन मोठे धक्के दिले. KKRचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या रणनीतीसमोर DC अपयशी ठरलेले दिसले अन् सोपा सामना अवघड झाला. रोव्हमन पॉवेल ( Rovman Powell) व अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी संघर्ष केला. अक्षर बाद झाल्यानंतर पॉवेलने दिल्लीला विजय मिळवून दिला. चार विकेट्स घेणारा कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) या विजयाचा शिल्पकार ठरला. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) व मुस्ताफिजूर रहमान यांनीही हातभार लावला.
लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्लीला उमेश यादने पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉला बाद करून धक्का दिला. मिचेल मार्शला ( १३) हर्षित राणाने बाद केले. डेव्हिड वॉर्नर व ललित यादव यांनी ४९ चेंडूंतील ६५ धावांची भागीदारी करत डाव सावरला, परंतु उमेश यादवने ही जोडी तोडली. १०व्या षटकात उमेशला पुन्हा गोलंदाजीला बोलावण्याचा डाव यशस्वी ठरला. वॉर्नर २६ चेंडूंत ४२ धावा करून माघारी परतला. त्यानंतर सुनील नरीनने ११व्या षटकात ललितची ( २२) विकेट घेतली. KKRचा कर्णधार श्रेयस अय्यर याने उमेशला आणखी एक षटक दिले आणि त्याने विश्वास सार्थ ठरवताना दिल्लीचा कर्णधार रिषभला ( २) माघारी पाठवले. उमेशने ४ षटकांत २४ धावांत ३ विकेट्स घेताना दिल्लीचा निम्मा संघ ८४ धावांत तंबूत पाठवला.
अक्षर पटेल व रोव्हमन पॉवेल यांनी संघर्ष केला, पंरतु एक अतिरिक्त धाव घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी विकेट फेकली. अक्षर २४ धावांवर रन आऊट झाला. सामना अटीतटीचा असताना पॉवेलने चांगली फटकेबाजी केली, नशिबानेही त्याला साथ दिली. पॉवेलने दिल्लीला ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. पॉवेलने १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद ३३ धावा केल्या. दिल्लीने १९ षटकांत ६ बाद १५० धावा केल्या.
दरम्यान, दिल्लीने कुलदीप यादव ( ४-१४) व मुस्ताफिजूर रहमान ( ३-१८) यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कोलकाताला ९ बाद १४६ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. चेतन सकारिया व अक्षर पटेल यांनी कोलकाताला सुरुवातीला धक्के दिल्यामुळे इतर गोलंदाजांना प्रोत्साहन मिळाले. KKRकडून कर्णधार श्रेयस अय्यर ( ४२) व नितिश राणा ( ५७) यांनी चांगला खेळ केला. नितिशने रिंकू सिंगसोबत ३५ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. २०व्या षटकात रिंकू २३ धावांवर बाद झाला. मुस्ताफिजूर रहमानने अखेरच्या षटकात तीन विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2022, DC vs KKR Live Updates : Delhi Capitals beating the Kolkata Knight Riders by 4 wickets, KKR have now lost last five matches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.