Kuldeep Yadav, IPL 2022 DC vs KKR Live Updates: कुलदीप यादवचा बळींचा चौकार आणि खलील अहमदचे तीन बळी यांच्या बळावर दिल्लीच्या संघाने कोलकालावर मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना डेव्हि़ड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ने २१५ धावांपर्यंत मजल मारली. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) देखील दमदार प्रत्युत्तर दिलं. पण श्रेयस अय्यरच्या अर्धशतकानंतरही कोलकाताला १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे दिल्लीने ४४ धावांनी विजय मिळवला.
कोलकाताने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीच्या सलामीवीरांनी तुफान फटकेबाजी केली. पृथ्वी शॉ ने २९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने ४५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. स्वत:ला क्रमवारीत बढती मिळालेला रिषभ पंतही १४ चेंडूत २७ धावा खेळून गेला. ललित यादव (१) आणि रॉवमन पॉवेल (८) हे दोघे स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर शेवटच्या टप्प्यात शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल या दोघांनी २० चेंडूत नाबाद ४९ धावा चोपल्या. शार्दूलने ११ चेंडूत नाबाद २९ तर अक्षरने १४ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. कोलकाताच्या सुनील नरिनने सर्वाधिक दोन बळी घेतले.
दिल्लीने दिलेल्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर अजिंक्य रहाणे (८) आणि व्यंकटेश अय्यर (१८) दोघेही स्वस्तात माघारी परतले. नितीश राणाने २० चेंडूत ३० धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी खेळी केली. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ५४ धावा केल्या. सॅम बिलिंग्स (१५), पॅट कमिन्स (४), सुनील नरिन (४), उमेश यादव (०) आणि आंद्रे रसल (२४) या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. कुलदीप यादवने मात्र एकाच षटकातील ३ विकेट्ससह एकूण ३५ धावांत ४ बळी टिपले. तर खलील अहमदने ३ गडी बाद केले.
Web Title: IPL 2022 DC vs KKR Live Updates Kuldeep Yadav Excellent bowling Delhi Capitals beat Kolkata Knight Riders by 44 Runs even after Shreyas Iyer Captain Innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.