IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील No Ball वाद ताजा असताना दिल्ली कॅपिटल्सच्या आजच्या लढतीतही तसाच प्रकार घडला. RRविरुद्धच्या लढतीत अखेरच्या षटकात ३६ धावांची गरज असताना रोव्हमन पॉवेलने पहिले तीन चेंडू षटकार खेचले. तिसरा चेंडू फुलटॉस होता आणि तो No Ball देण्याची मागणी दिल्लीच्या खेळाडूंनी केली. रिषभ पंतने चिडचिड करत फलंदाजांना माघारी बोलावले, तर सहाय्यक प्रशिक्षक प्रविण अमरे मैदानावर जाब विचारायला धावले. या सर्वांवर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली. त्यात आजच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही No Ball वरून रिषभ चिडलेला दिसला.
KKRच्या डावातील १७व्या षटकात हा प्रकार घडला. ललित यादवने टाकलेला तिसरा चेंडू फुलटॉस पडला आणि नितिश राणाने त्या चेंडूवर षटकार खेचला. अम्पायरने तो No Ball दिला. त्याचा जाब विचारण्यासाठी रिषभ पंत अम्पायरकडे गेला.
दरम्यान, दिल्लीने कुलदीप यादव ( ४-१४) व मुस्ताफिजूर रहमान ( ३-१८) यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कोलकाताला ९ बाद १४६ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. चेतन सकारिया व अक्षर पटेल यांनी कोलकाताला सुरुवातीला धक्के दिल्यामुळे इतर गोलंदाजांना प्रोत्साहन मिळाले. KKRकडून कर्णधार श्रेयस अय्यर व नितिश राणा यांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी ४८ धावांची भागीदारी केली. अय्यर ३७ चेंडूंत ४२ धावांवर माघारी परतला. नितिशने रिंकू सिंगसोबत ३५ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. २०व्या षटकात रिंकू २३ धावांवर बाद झाला. नितिशने ३४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. मुस्ताफिजूर रहमानने अखेरच्या षटकात तीन विकेट्स घेतल्या.