IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचं आव्हान लोकेश राहुलने स्वीकारलं. लखनौ सुपर जायंट्सने क्विंटन डी कॉक व लोकेशच्या चांगल्या सुरूवातीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सवर दडपण बनवलं. क्विंटन बाद झाल्यानंतर दीपक हुडाने DCच्या गोलंदाजांना बदडले. लोकेशनेही त्यात हात धुवून घेतले आणि मोठ्या विक्रम नावावर केला. लोकेशने ३५ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले.
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत LSG ने पहिले षटक सावधपणे खेळले. त्यानंतर क्विंटन डी कॉक व कर्णधार लोकेश राहुल यांनी फटकेबाजी सुरू केली. DC कॅप्टन रिषभ पंतला चार गोलंदाजांकडून पहिली चार षटकं टाकून घ्यावी लागली. ललित यादवने चौथ्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर १४ धावांवर असणाऱ्या लोकेशचा झेल सोडला. पाचव्या षटकात शार्दूल ठाकूरला बोलावण्याचा निर्णय योग्य ठरला आणि त्याने क्विंटनला ( २३) बाद केले. लखनौने पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ विकेट गमावून ५७ धावा केल्या. लोकेशने संयमी खेळ करताना लखनौची धावसंख्या वाढवली आणि आयपीएलच्या याही पर्वात त्याने ४००+ धावांचा टप्पा ओलांडला. सलग पाच पर्वांत त्याने हा पराक्रम केला आहे.
लोकेश खिंड लढवत होता आणि त्याला दीपक हुडाची चांगली साथ मिळाली. या दोघांनी १०च्या सरासरीने धावांचा ओघ सुरूच ठेवला. दिल्लीचा हुकमी एक्का कुलदीप यादव यालाही या जोडीने सोडले नाही. त्याच्या पहिल्या दोन षटकांत २६ धावा चोपून काढल्या. कुलदीपला षटकार मारून लोकेशने आयपीएलमध्ये सर्वात कमी डावांत १५० षटकार खेचण्याचा विक्रम नोंदवला. लोकेशने ९६ डावांत हा विक्रम करताना संजू सॅमसन ( १२५ डाव) व सुरेश रैना ( १२८) यांचा विक्रम मोडला. रोहित शर्मा ( १२९ ) व विराट कोहली ( १३२) यांनीही या विक्रमासाठी बऱ्याच इनिंग्ज खेळल्या.