IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचे दोन्ही सलामीवीर १३ धावांवर माघारी परतले. त्यानंतर मिचेल मार्श व रिषभ पंत यांनी धु धु धुतले... मार्शच्या दुर्दैवी विकेटनंतर फॉर्मात असलेला ललित यावदही बाद झाला. कर्णधार रिषभ पंत व रोव्हमन पॉवेल ही जोडी चांगली जमली होती, परंतु मोहसिन खानने ( Mohsin Khan) भन्नाट चेंडू टाकून रिषभचा त्रिफळा उडवला अन् त्यानंतर दणादण दोन धक्के दिले. आयपीएल २०१८पासून मुंबई इंडियन्ससोबत असणाऱ्या मोहसिनला LSGने संधी दिली आणि त्याचं त्यानं सोनं केलं. चार विकेट्स घेत त्याने लखनौला विजय मिळवून दिला.
दुश्मंथा चमिराने दुसऱ्याच षटकात दिल्लीला धक्का दिला. पृथ्वी ( ५) झेलबाद झाला. डेव्हिड वॉर्नरही ३ धावांवर बाद झाला. मिचेल मार्श व रिषभ पंत यांनी २५ चेंडूंत ६० धावा जोडल्या. मार्शला मग गौथमने बाद केले. तो २० चेंडूंत तो ३ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर माघारी परतला. पण, अल्ट्राएजमध्ये बॅट व चेंडूचा संपर्कच झाला नसल्याचे दिसले.रवी बिश्नोईने त्यानंतर फॉर्मात असलेल्या ललित यादवला ( ३) त्रिफळाचीत केले. रिषभ व रोव्हमन पॉवेल हे चांगले फटके मारत होते. पॉवेलने तर १२व्या षटकात गौथमच्या गोलंदाजीवर ६,६,४ असे दणदणीत फटके मारले. १३व्या षटकात मोहसिन खानने भारी चेंडू टाकला. फटकेबाजीच्या प्रयत्नात असलेल्या रिषभची बॅट अन् पॅड याच्या मधून तो चेंडू ज्या वेगाने यष्टिंवर आदळला, त्याच्या आवाजाने स्टेडियवर सन्नाटा पसरला.
क्विंटन डी कॉक व लोकेश यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लोकेश व दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह LSGला मोठी धावसंख्या उभारून दिली. क्विंटन डी कॉक ( २३) व राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर लोकेश आणि दीपक हुडा यांनी ६१ चेंडूंत ९५ धावा जोडल्या. दीपक ३४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांवर बाद झाला. स्वतःच्याच गोलंदाजीवर शार्दूलने मस्त रिटर्न कॅच घेतला. लोकेश ५१ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७७ धावांवर माघारी परतला. लखनौला ३ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. मार्कस स्टॉयनिसचा ( १७*) खेळ संथ झाला. तीनही विकेट शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) घेतल्या.
कोण आहे मोहसिन खान?उत्तर प्रदेशच्या या खेळाडूला लखनौ सुपर जायंट्सने २० लाखांत आपल्या ताफ्यात घेतले. १५ जुलै १९९८ सालचा त्याचाय जन्म. २०१७-१८मध्ये त्याने उत्तर प्रदेशकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी २०१८मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ऑक्शनमध्ये ताफ्यात घेतले. त्याचवर्षी त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्येही पदार्पण केले. आयपीएल २०२०मध्ये मुंबईने पुन्हा त्याला आपल्या ताफ्यात घेतले, परंतु खेळवले नाही.