IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दोन खेळाडूंसह सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल खचायला हवे होते, परंतु पंजाब किंग्सविरुद्ध ते आणखी ताकदीने मैदानावर उतरले. मिचेल स्टार्कनंतर टीम सेईफर्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तरीही आहे त्या खेळाडूंना सोबतिला घेऊन DCचा संघ मैदानावर उतरला अन् PBKSला जबरदस्त धक्के दिले. कर्णधार रिषभ पंतने घेतलेला कॅच या सामन्यात लक्षवेधी ठरला.
नाट्यमय घडामोडीनंतर अखेर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( DC vs PBKS) हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू झाला. आजच्या लढतीत नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने लागला आणि त्यांनी अपेक्षित प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोरोना पॉझिटिव्ह मिचेल मार्शच्या जागी दिल्लीने सर्फराज खानला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा दिली. पंजाब किंग्सचा कर्णधार मयांक अग्रवाल दुखापतीतून सावरला असून आज ओडीन स्मिथच्या जागी नॅथन एलिसला संधी मिळाली आहे.
शिखर धवन व मयांक अग्रवाल यांना साजेशी सुरूवात करता आली नाही. शिखर ( ९) चौथ्या षटकात ललित यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. यष्टिरक्षक रिषभ पंतने सुरेख झेल टिपला. त्यानंतर मुस्ताफिजून रहमानने टाकलेला चेंडू मयांकच्या बॅटची कड घेत यष्टिंवर आदळला. मयांकला १५ चेंडूंत २४ धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतर रिषभने कल्पक नेतृत्व करताना सुरेख क्षेत्ररक्षण लावले. लाएम लिव्हिंगस्टोन ६व्या षटकात अक्षर पटेलला पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाला. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( ९) खलिल अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पंजाब किंग्सचे ४ फलंदाज ५४ धावांवर माघारी परतले.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कोणाला झाला कोरोना?
- पॅट्रीक फॅरहॅट- फिजिओथेरपिस्ट ( १५ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- चेतन कुमार - स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट ( १६ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- मिचेल मार्श - खेळाडू ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- अभिजित साळवी - टीम डॉक्टर ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- आकाश माने - सोशल मीडिया कंटेन्ट टीम सदस्य ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- टीम सेईफर्ट - खेळाडू ( २० एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)