IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलर ( Jos Buttler ) आणि देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीने आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना हतबल केले. राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीरांनी वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. या दोघांनी १५ षटकांत १५५ धावा फलकावर चढवताना विक्रमी भागीदारी केली. राजस्थान रॉयल्सकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी बेन स्टोक्स व संजू सॅमसन यांनी २०२०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १५२ धावांची भागीदारी केली होती. बटलरने यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खलिल अहमदने पहिले षटक अफलातून फेकले, परंतु राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने नशिबाने दोन चौकार कमावले. राजस्थानने सावध सुरूवात केली. कर्णधार संजू सॅमसन याचा हा RRकडून १००वा आयपीएल सामना आहे आणि अजिंक्य रहाणेनंतर राजस्थानकडून हे शतक पूर्ण करणारा पहिलाच खेळाडू आहे. मुस्ताफिजूर रहमानने टाकलेल्या चौथ्या षटकात देवदत्त पडिक्कलने सुरेख फटके मारले आणि त्या षटकात सलग तीन चौकारांसह १४ धावा चोपल्या. DC कर्णधार रिषभने चार षटकांत चार गोलंदाजांचा प्रयोग करून पाहिला. ६व्या षटकात पुन्हा अहमदला पाचारण करण्यात आले आणि यावेळेस बटलरची बॅट खणखणीत चालली. त्या षटकात १५ धावा कुटून बटलरने IPL 2022मध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडला.
मपण, बटलरने ५७ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकी खेळीत ८ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. आयपीएलच्या एका पर्वात ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो विराटनंतर दुसरा फलंदाज ठरला. शिखर धवननंतर सलग शतक झळकावण्याचा मानही त्याने पटकावला.