Join us  

Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : जोस बटलरने शतकी खेळीत १८ चेंडूंत कुटल्या ९० धावा; दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा 

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : आजचा दिवसही जोस बटलरच्या नावावर राहिला. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची कत्तल करताना राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीराने सलग दुसरे शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 9:25 PM

Open in App

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : आजचा दिवसही जोस बटलरच्या नावावर राहिला. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची कत्तल करताना राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीराने सलग दुसरे शतक झळकावले. त्याने या शतकी खेळीत १८ चेंडूंत ९० धावांचा पाऊस पाडला. त्याने देवदत्त पडिक्कलसह पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची विक्रमी भागीदारी केली. राजस्थान रॉयल्सकडून ही सर्वोत्तम  भागीदारी ठरली. यापूर्वी बेन स्टोक्स व संजू सॅमसन यांनी २०२०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १५२ धावांची भागीदारी केली होती. बटलरने यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. बटलरच्या या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानने आज दिल्लीसमोर तगडे आव्हान उभे केले. आयपीएलच्या मागील ८ डावांतील त्याचे हे चौथे शतक ठरले. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खलिल अहमदने पहिले षटक अफलातून फेकले, परंतु राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने नशिबाने दोन चौकार कमावले. मुस्ताफिजूर रहमानने टाकलेल्या चौथ्या षटकात देवदत्त पडिक्कलने सुरेख फटके मारले आणि त्या षटकात सलग तीन चौकारांसह १४ धावा चोपल्या. DC कर्णधार रिषभने चार षटकांत चार गोलंदाजांचा प्रयोग करून पाहिला. ६व्या षटकात पुन्हा अहमदला पाचारण करण्यात आले आणि यावेळेस बटलरची बॅट खणखणीत चालली. यानंतर बटलरची बॅट तुफान चालली..  कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर यांनाही त्याने नाही सोडले आणि ३६ चेंडूंत यंदाच्या पर्वातील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पडिक्कलनेही तुफान फटकेबाजी केली. पडिक्कलनेही ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांची फटकेबाजी रोखण्यात दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला यश मिळत नव्हते अन् कर्णधार रिषभच्या चेहऱ्यावर ती हतबलता प्रकर्षाने दिसत होती. १५ षटकात १५५ धावा फलकावर चढवल्यानंतर खलिल अहमदने ही भागीदारी संपुष्टात आणली. खलिलने भन्नाट यॉर्कर टाकून पडिक्कलला LBW केले. रिषभचा DRS यशस्वी ठरला. पडिक्कलने ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा कुटल्या.  

पण, बटलरने ५७ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकी खेळीत ८ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. आयपीएलच्या एका पर्वात ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो विराटनंतर दुसरा फलंदाज ठरला. शिखर धवननंतर सलग शतक झळकावण्याचा मानही त्याने पटकावला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसननेही हात साफ केले आणि आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पाही ओलांडला. खलिलने १८व्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर सॅमसनला जीवदान दिले. १९व्या षटकात बटलरला बाद करण्यात अखेर दिल्लीला यश आले. त्याने ६५ चेंडूंत ९ चौकार व ९ षटकारांनी ११६ धावांची खेळी केली.  आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. कर्णधार सॅमसननेही १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४६ धावा चोपल्या. राजस्थानने २ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२जोस बटलरराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App