IPL 2022 DC vs RR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात शुक्रवारी मोठा राडा झाला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) याने अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. दिल्लीच्या ताफ्यातील प्रत्येक जण संतापला होता. सहाय्यक प्रशिक्षक प्रविण अमरे ( Pravin Amre) यांनी थेट मैदानावर धाव घेताना अम्पायरशी हुज्जत घातली. त्यांना शार्दूल ठाकूरचीही साथ मिळाली. या सर्वांवर बीसीसीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयपीएलच्या नियमांचा भंग केल्या प्रकरणी या तिघांवरही कारवाई करण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या डावातीव २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हा सर्व प्रकार घडला. २२२ धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला अखेरच्या ६ चेंडूंवर ३६ धावा करायच्या होत्या आणि रोव्हमन पॉवेलने २०व्या षटकातील पहिले तीन चेंडू षटकार खेचले. तिसरा चेंडू फुलटॉस होता आणि तो No Ball असल्याचा दावा दिल्लीच्या खेळाडूंनी केली. त्यात कर्णधार रिषभने फलंदाजांना माघारी बोलावले. अमरे दाद मागण्यासाठी मैदानावर धावले आणि शार्दूलनेही नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याला १०० टक्के मॅच फी दंड म्हणून भरावी लागणार आहे. म्हणजेच त्याला १.१५ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. पंतने कलम २.७मधील दुसऱ्या स्थराच्या नियमाचा भंग केला आणि त्याने त्याची चूक मान्य केली. शार्दूल ठाकूरला त्याच्या मॅच फीची ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. सहाय्यक प्रशिक्षक अमरे यांना १०० टक्के मॅच फी व एका सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावली गेली आहे.
जोस बटलरच्या ११६ धावा, देवदत्त पडिक्कलच्या ५४ आणि संजू सॅमसनच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर राजस्थानने २ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ ( ३७) , डेव्हिड वॉर्नर ( २८), रिषभ पंत ( ४४) व ललित यादव ( ३७) व रोव्हमन पॉवेल ( ३६) यांनी दमदार खेळ केला. दिल्लीला ८ बाद २०७ धावाच करता आल्या. प्रसिद्ध कृष्णाने तीन, तर आर अश्विनने दोन विकेट्स घेतल्या.