क्रिकेट या महानगराच्या खेळाला गावोगावी पोहोचवण्यामागे आयपीएलने महत्त्वाची वेळोवेळी भूमिका बजावली. यातूनच अनेक युवा खेळाडू पुढे आले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पटलावर चमकण्याची संधी मिळायला लागली. आयपीएलच्या क्षितिजावर दरवर्षी नवे तारे जन्माला येत असतात. मैदानावरील आपल्या अद्वितीय कामगिरीने ते अनेकांचे लक्षही वेधून घेतात. गेल्या १४ वर्षांपासून याची प्रचीती वेळोवेळी आलेली आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही असेच काही गुणवान क्रिकेटपटू स्पर्धेवर आपली छाप उमटविण्यास सज्ज झाले आहेत. याच संभाव्य युवा सिताऱ्यांवर टाकलेली एक नजर...
डेवाल्ड ब्रेविस
दक्षिण आफ्रिकेत एबी डिव्हिलियर्सचा उत्तराधिकारी म्हणून १८ वर्षांच्या डेवाल्ड ब्रेविसकडे बघितले जाते. डिव्हिलियर्ससारखीच फलंदाजीतली नजाकत, मैदानावर चौफेर फटकेबाजीची क्षमता आणि उपयुक्त ऑफ ब्रेक गोलंदाजी. १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू वेबी एबी या टोपण नावे प्रसिद्ध आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात असलेल्या या खेळाडूवर अनेकांच्या नजरा असतील.
राजवर्धन हंगरगेकर
महाराष्ट्राच्या उस्मानाबादचा रहिवासी असलेल्या या खेळाडूने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताच्या १९ वर्षांखालील विश्वविजेतेपदात मोलाचा वाटा उचलला. राजवर्धनच्या गोलंदाजीचा वेग अनेकांना भुरळ घालणारा आहे. शिवाय चेंडू सीमापार मारण्याची त्याची क्षमता अद्भुत आहे. राजवर्धनच्या याच गुणांमुळे चेन्नईसारख्या दिग्गज संघाने लिलावात त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच तो अंतिम संघात दिसला तर नवल वाटायला नको.
यश धूल
येत्या दोन वर्षांत भारतीय संघात स्थान मिळविण्याचा चंग बांधलेला भारताच्या युवा संघाचा हा कर्णधार यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीची छाप पाडू शकतो. पदार्पणाच्या रणजी सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या धूलला दिल्लीने संघात घेतले आहे. मधल्या फळीसाठी तो उत्तम पर्याय ठरू शकतो. मोठा सामन्यांचा फलंदाज म्हणून धूलकडे बघितले जाते.
अभिनव मनोहर
कर्नाटकचा २७ वर्षांचा अभिनव त्याच्या ताकदवान फलंदाजीसाठी अनेकांना परिचित आहे. मधल्या फळीत फलंदाजीला येऊन आक्रमक खेळी करण्यात त्याचा हातखंडा आहे. सय्यद मुश्ताक अली चषकात कर्नाटकसाठी चांगल्या खेळी केल्याची पावती त्याला लिलावात मिळाली. नवख्या गुजरात टायटन्सने २.६० कोटींच्या बोलीवर त्याला संघात घेतले. कामचलाऊ लेग स्पीन गोलंदाजी करण्यातही अभिनव पटाईत आहे.
रोवमन पॉवेल
या वर्षी जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात रोवमनने धडकेबाजी शतकी खेळी करीत अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. ७५ लाख मूळ किंमत असलेल्या या जमैकन खेळाडूवर चक्क २.८० कोटींपर्यंत बोली गेली होती. अखेर याच किमतीवर दिल्लीने त्याला आपल्या गोटात ओढले. एक उत्तम फिनिशरची कामगिरी रोवमन या वर्षी दिल्लीसाठी पार पाडू शकतो.
Web Title: IPL 2022 dewald brevis rajvardhan hangargekar yash dhull rovman powell to do ipl debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.