पुणे - आयपीएल २०२२च्या ४९ व्या सामन्यामध्ये बंगळुरूने चेन्नई सुपरकिंग्सला १३ धावांनी पराभूत केले. या पराभवाबरोबरच चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यंदाच्या संपूर्ण हंगामात चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी सुमार झाली आहे. पहिल्या टप्प्यात रवींद्र जडेजाने संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र त्याच्या नेतृत्वात सीएसकेचा संघ कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. मात्र त्यालाही फार कमाल दाखवता आली नाही. दरम्यान, आरसीबीकडून झालेल्या पराभवाला सर्वाधिक जबाबदार हा धोनीच होता, असे चित्र आता समोर येत आहे.
आरसीबीविरुद्ध झालेल्या लढतीत महेंद्रसिंग धोनीच्या एका निर्णयामुळे सीएसकेला पराभूत व्हावे लागले. धोनीने या सामन्यात संघाचा सर्वात महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला खेळवले नाही. त्यापूर्वी हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही त्याला संधी देण्यात आली नव्हती. तेव्हा तो जखमी असल्याचे सांगण्यात आले होते. त्या सामन्यात धोनीचा संघ जिंकला. मात्र काल आरसीबीविरुद्धही त्याला अंतिम ११ जणांमध्ये स्थान देण्यात आले नाही. हा निर्णय चेन्नईच्या संघावर उलटला.
ब्राव्होची आयपीएल २०२२ मधील कामगिरी दमदार झालेली आहे. यावर्षी चेन्नईकडून त्याने सर्वाधिक बळी टिपले आहेत. त्याने ८ सामन्यात १४ बळी टिपले आहेत. ब्राव्होचे संघात नसणे चेन्नईसाठी पराभवाचं मोठे कारण ठरले. कारण शेवटच्या षटकांमध्ये खालच्या क्रमांकावर येऊन तो फलंदाजीच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटवू शकला असता. ब्राव्होच्या अनुपस्थितीत चेन्नईची लोअर मिडल ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली, अखेरीस चेन्नईला १३ धावांनी पराभव पत्करावा लागाला.
कप्तानीबरोबरच यावर्षी फलंदाजीमध्येही धोनी फार काही कमाल दाखवू शकलेला नाही. मुंबईविरुद्धचा एक सामना वगळता इतर लढतीत धोनीला त्याचा क्लास दाखवता आलेला नाही. आरसीबीविरुद्धच्या लढतीतही धोनी केवळ २ धावा काढून बाद झाला. तर धोनीप्रमाणेच रवींद्र जडेजाही अपयशी ठरला. तो केवळ ३ धावा काढून बाद झाला.