मुंबई : राजस्थानविरुद्ध २६ चेंडूत ४५ धावा ठोकणारा आरसीबीचा ‘मॅचविनर’ शाहबाज अहमद हरियाणाच्या मेवातमधील सिकरावा गावातील मुलगा. वडील अहमद जान हे पडवल येथे शासकीय नोकरीत आहेत. मुलाने सिव्हिल इंजिनियर व्हावे असे त्यांना वाटायचे.
शाहबाज १२ वी होताच त्याला फरीदाबादच्या विद्यापीठात प्रवेश देण्यात आला. शाहबाजने क्रिकेटच्या नादात तीन वर्षांची पदवी मिळविण्यासाठी तब्बल ११ वर्षे घेतली. आई नेहमी म्हणायची डिग्रीचे शिक्षण पूर्ण कर. शाहबाज उत्तर द्यायचा, ‘आई डिग्रीची काळजी करू नकोस, ती घरबसल्या येईल!’ २०२२ च्या जानेवारीत शाहबाजला पदवीदान सोहळ्यात पदवी मिळाली.
मुलगा क्रिकेटपटू बनल्याने पदवीदान सोहळ्यात आम्हाला विशेष सन्मान मिळाल्याचे शाहबाजच्या वडिलांनी सांगितले. शाहबाज क्रिकेटसाठी इंजिनिअरिंगच्या वर्गाला दांडी मारायचा. ‘तुमचा मुलगा उपस्थित राहात नाही,’ असे कॉलेजने कळविले तेव्हा, शाहबाजच्या क्रिकेटबद्दल कुटुंबीयांना कळले. गुडगावच्या तिहरी येथील क्रिकेट अकादमीत जायला लागला. प्रशिक्षक मन्सूर अली यांच्या मार्गदर्शनात शाहबाज घडला.
शाहबाजला त्याचा मित्र प्रमोद चंदीला याने क्रिकेटसाठी बंगालला नेले. स्थानिक क्रिकेट गाजविल्यामुळे २०१८-१९ ला शाहबाजला बंगालच्या रणजी संघात स्थान मिळाले. पुढे २०१९ ला त्याची निवड भारताच्या अ संघात झाली. २०२० च्या आयपीएल लिलावात शाहबाज २० लाखात आरसीबी संघात आला. यूएईत त्याला केवळ दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली होती. २०२१ ला देखील तो याच संघात होता. शाहबाजचे आजोबाही क्रिकेट खेळायचे. मेवात हे गाव शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. डॉक्टर आणि इंजिनियर होण्याकडे गावातील प्रत्येकाचा कल असतो. शाहबाज इंजिनियर बनला; पण ओळख मात्र क्रिकेटपटू म्हणून लाभली. शाहबाजची बहीण फरहीन डॉक्टर आहे.