- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
आयपीएल २०२२ मधून माघार घेणाऱ्या दिग्गज खेळाडूंमध्ये मार्क वूडचीदेखील भर पडली. हा नवा संघ लखनौ जायंट्सवर मोठा आघात ठरला. आधी आक्रमक सलामीवीर जेसन रॉय (गुजरात टायटन्स) आणि ॲलेक्स हेल्स (केकेआर) यांनी माघार घेतली. माघारीमुळे या संघांच्या रणनीतीला खीळ बसली असणार. केकेआर आणि गुजरातने ही पोकळीे भरून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. हेल्सची जागा ऑस्ट्रेलियाचा टी-२० चा कर्णधार ॲरोन फिंच आणि रॉय याची जागा अफगाणिस्तानचा युवा खेळाडू रहमानउल्लाह गुलराज यांनी घेतली. लखनौ संघ वूडच्या बदलीची घोषणा करेल, पण एक आठवडा शिल्लक असताना त्यांची निराशा झाली असावी.बायोबबलमुळे की मी पैशामुळे माघार?इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात कोपराला दुखापत झाल्यामुळे वड्सने माघार घेतली. तो राष्ट्रीय संघातही दिसणार नाही. रॉय आणि हेल्स यांनी मात्र आयपीएलमध्ये भाग घेण्यास नकार दिला. कारण ते बायोबबलमध्ये जास्त वेळ घालवण्यास तयार नाहीत. दोघेही टी-२० त सक्रिय खेळाडू आहेत. रॉय तर पांढऱ्या चेंडूवर बराच सक्रिय खेळाडू आहे. आयपीएलचा मेगा लिलाव फार आधी झाला. बायोबबलचा इतका कंटाळा वाटत असेल, थकवा जाणवत असेल तर दोघांनीही लिलावासाठी स्वत:ला उपलब्ध का ठेवले?उदा. ज्यो रुट आणि बेन स्टोक्स या दोन इंग्लिश दिग्गजांनी आधीच लिलावातून माघार घेतली. याशिवाय मिचेल स्टार्क, काइली जेमिसन आणि सॅम कुरेन हे इतर तीन मोठे खेळाडू. त्यांनीदेखील हाच कित्ता गिरविला. मग रॉय आणि हेल्स असे का करू शकले नाहीत? प्रश्न असाही उपस्थित होतो की, या दोघांना अपेक्षित किंमत मिळाली नाही काय? रॉय मूळ किंमत दोन कोटी तर हेल्स मूळ किंमत दीड कोटीतच विकला गेला होता. दोन्ही फ्रॅन्चायजींकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रया आलेली नाही. मात्र व्यवस्थापन दोघांवर नाखूश असल्याचे संकेत मिळाले आहेत. या खेळाडूंना मूळ किमतीत चार-पाच पटींची भर घालून घेतले असते तर फरक जाणवला असता का? लखनौ आणि गुजरातच्या संघाला सध्या तरी असेच वाटत असावे.
संघ मालकांची निराशाखरेतर आयपीएल संघ मालकांमध्ये विदेशी खेळाडूंच्या बांधीलकीवरून साशंकता आहे. मुख्यत: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूबाबत फ्रॅन्चायजी जास्त साशंक असतात. याच कारणास्तव फिंचसह अनेक जण मेगा लिलावात विकले गेले नव्हते. या दोन देशातील अनेक खेळाडूंनी आयपीएलच्या मागच्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात यूएईत खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनेक संघांची निराशा झाली. त्यात पॅट कमिन्स आणि ॲडम झम्पा यांचा समावेश होता. यंदा लेग स्पिनर्सना अधिक मागणी होती, तरीही झम्पामध्ये कुणीही रस घेतला नाही. एका फ्रॅन्चायजीशी संबंधित अधिकाऱ्यानुसार ‘आस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील खेळाडूंची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यांच्या बोर्डाकडून त्यांना चांगला मोबदला दिला जातो, त्यामुळे दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश यांसारख्या देशांतील खेळाडूंच्या तुलनेत ते जोखीम पत्करू इच्छित नाहीत.अधिक पैसा कमविण्याची लालसाया युक्तिवादामागील दुसरी बाजू अशी की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया वगळता इतर देशांतील खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास टाळाटाळ करतात शिवाय त्यांचे बोर्डदेखील त्यांना सूट देते. उदा. मेगा लिलावात यशस्वी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंना बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यातून त्यांच्या बोर्डाने सूट दिली. त्याऐवजी हे खेळाडृ भारतात दाखल झाले. याचे मोठे कारण असे की त्यांच्या मिळणारी रिटेनरशिप ही आयपीएलमध्ये जेवढे कमाई करू शकतात त्या तुलनेत फार कमी असते. खेळाडूंची कारकीर्द कधी संपुष्टात येईल, याचा नेम नाही. दुखापतीचा धोका, फॉर्म गमावणे या धोक्यांमुळे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा टी-२० लीगला प्राधान्य देतात हे पूर्णपणे मान्य नसले तरी काहीसे पटण्यासारखे आहे. आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या परदेशी खेळाडूंची विश्वासार्हता त्रासदायक असली तरी देशातील काही क्लबसंबंधी कोंडीदेखील अद्याप सुटलेली नाही.