अयाज मेमन
आयपीएलमध्ये यंदा वेगवान गोलंदाजीत भारताच्या युवा गोलंदाजांनी लक्ष वेधले. फिरकीतही ज्यांना नाकारले होते अशा अनुभवी खेळाडूंनी ठसा उमटविला. मी लिहीत असताना यंदा टॉप पाच गोलंदाजांमध्ये युझवेंद्र चहल, वानिंदू हसरंगा, कॅगिसो रबाडा, उमरान मलिक आणि कुलदीप यादव यांची गणना झाली. या पाचमध्ये तीन फिरकी गोलंदाज आहेत. याचा अर्थ वेगवान माऱ्याने धडकी भरविली असताना फिरकीपटूंनी वर्चस्व गाजविले आहे.
मागे वळून पाहिल्यास असे दिसेल की, मागच्या वर्षी हर्षल पटेल, आवेश खान, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांचा दबदबा जाणवला. त्याआधी २०२० मध्ये रबाडा, एन्रिच नोर्खिया, बुमराह आणि ट्रेंट बोल्ट लक्षवेधी ठरले होते. तज्ज्ञ आणि चाहत्यांचा अनेकदा तर्क असतो की, टी-२० त फिरकीपटूंची भूमिका नसते. माझ्या मते, उच्च दर्जाचे गोलंदाज कोणत्याही फाॅर्मेटमध्ये यशस्वी ठरतात. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक पाच बळी घेणाऱ्यात ड्वेन ब्राव्हो, लसिथ मलिंगा (दोन्ही वेगवान गोलंदाज) यांच्यासोबतच अमित मिश्रा, युजवेंद्र चहल आणि पीयूष चावला या फिरकीपटूंचा समावेश आहे.
पुढे सांगायचे झाल्यास मिश्रा, चहल आणि चावला हे सर्व लेगस्पिनर आहेत. त्यांच्या यशामुळे मनगटाच्या स्पिनर्सची मागणी वाढली. मग प्रश्न पुढे येईल की, केवळ स्पिनर असणे ही चांगली कामगिरी करण्याची हमी नाही. टी-२० त यशस्वी होण्यासाठी उच्च कौशल्य आणि संयमी वृत्ती आवश्यक आहे. चहल, कुलदीप, अश्विनचे या मोसमातील यश खूप उल्लेखनीय ठरले, कारण त्यांनी निवडकर्त्यांना राष्ट्रीय संघात निवडीसाठी विचार करण्यास भाग पाडले. टी-२० विश्वचषकाचे आयोजन वर्षअखेर असून, फिरकीपटूंसाठी काही जागा निश्चितपणे रिकाम्या असू शकतील.
अश्विन, चहल आणि कुलदीप यांनी आयपीएलच्या माध्यमातून भारतीय संघात स्थान मिळवले होते. नंतर वन-डे आणि कसोटी संघात समावेश करण्यात आला.
तिघांमधील स्पर्धा तसेच रवींद्र जडेजा भक्कम दावेदार म्हणून पुढे आल्याने त्यांनी भारतीय संघातील स्थान गमावले. अश्विनला ‘रेड बॉल स्पेशालिस्ट’, तर चहल आणि कुलदीपला ‘व्हाईट बॉल स्पेशालिस्ट’ मानले जायचे; पण नंतर दोघांनीही वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलसारख्यांच्या आगमनाने टी-२० तील स्थान गमावले.
राहुल चहर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती यांसारख्या इतर प्रतिभावान तरुणांच्या यशामुळे चहल, कुलदीप आणि अश्विन यांना भारतीय संघात स्थान मिळविणे अशक्य वाटत आहे; पण त्यांनी सातत्याने शानदार कामगिरी करत युवा गोलंदाजांचे आव्हान मोडून काढले. तिघांपुढे मधल्या षटकांत मारा करण्याचे अवघड आव्हान होते. ते त्यांनी लीलया पेलले. बळी घेतले, शिवाय धावाही रोखल्या. अश्विनने तर अष्टपैलुत्व सिद्ध केले. प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या संघांचे ते प्रमुख खेळाडू आहेत. याउलट फिरकीपटूंची कामगिरी खराब झाल्याने सीएसके, मुंबई, केकेआर, पंजाब हे संघ स्पर्धेबाहेर पडले.
चहल, कुलदीप आणि अश्विन यांनी निवडकर्त्यांवर काय प्रभाव पाडला हे दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध टी-२० सामने खेळण्यासाठी संघ जाहीर झाल्यानंतर कळेलच; पण आयपीएलमध्ये या फिरकीपटूंनी डोळ्यात भरणारी कामगिरी केली. अजूनही ते थांबण्यास तयार नाहीत.
वानिंदू हसरंगा - १४ सामने २४ बळी
युझवेंद्र चहल - १४ सामने २६ बळी
रविचंद्रन अश्विन - १४ सामने ११ बळी
कुलदीप यादव - १३ सामने २० बळी
Web Title: IPL 2022: Fast bowlers push, but spinners sway in ipl 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.