मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या यंदाच्या सत्राच्या प्ले ऑफ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून, यानुसार बाद फेरीचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे रंगतील. त्याचप्रमाणे, महिला चॅलेंजर्स स्पर्धेचीही बीसीसीआयने घोषणा केली असून, ही स्पर्धा लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगेल.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्ले ऑफमधील क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर अनुक्रमे २४ आणि २५ मे रोजी खेळविला जाईल. यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर-२ (२७ मे) आणि अंतिम सामना (२९ मे) खेळविण्यात येईल. या चारही निर्णायक सामन्यांसाठी दोन्ही स्टेडियम्सवर १०० टक्के प्रेक्षक प्रवेशाची परवानगी मिळेल, अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दखल घेण्याची बाब म्हणजे २७ मेला लखनौ येथे एलिमिनेटर लढत जिंकणाऱ्या संघाला अंतिम लढतीसाठी सुमारे १,९०० किमी अंतराचा प्रवास करावा लागणार आहे.
२४ मेपासून महिला चॅलेंजर्स स्पर्धा लखनौ येथे २४ मे ते २८ मेदरम्यान महिला चॅलेंजर्स स्पर्धेत ट्रेलब्लेझर्स, सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी या तीन संघांचा समावेश असेल. सुपरनोव्हाजने २०१८ आणि २०१९ साली जेतेपदाला गवसणी घातली होती. २०२० मध्ये ट्रेलब्लेझर्सने पहिल्यांदा जेतेपद उंचावले होते. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा आयोजित झाली नव्हती.