IPL 2022 Final Controversy: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली रविवारी (२९ मे) पहिल्यांदाच गुजरात टायटन्स संघाने IPL ची ट्रॉफी उंचावली. गुजरात टायटन्स पदार्पणाच्या हंगामातच ही किमया साधली. संघातील एकमेव गुजराती खेळाडू हार्दिकने फायनल सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवली. या सामन्यासाठी अनेक बडे खेळाडू तर उपस्थित होतेच, पण त्यासोबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही हजेरी लावली होती. हा सामना नीट पार पडला, पण आता भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या विधानाने खळबळ माजली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्यांनी लिहिले, "इंटेलिजन्स एजन्सीची अशी धारणा आहे की IPL च्या निकालामध्ये काहीतरी गडबड करण्यात आली. त्यामुळे या संदर्भात तपास करण्याची आवश्यकता आहे आणि जनहितार्थ याचिकादेखील दाखल होण्याची गरज आहे." IPL चे अनेक सामने अतिशय अटीतटीचे झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश असलेली ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे या स्पर्धेत असे काही घडले असेल तर स्पर्धेला गालबोट लागण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलेला दावा साऱ्यांच्याच भुवया उंचावणारा आहे.
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही कुटुंबासह हजेरी लावली होती. राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सुरू असताना अमित शाह आणि त्यांची पत्नी सोनल शाह हे सामन्याचा आनंद घेत असल्याचे मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांना मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले, तेव्हा मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी उत्साहाने जल्लोष केला. अमित शहा यांनीही चाहत्यांना व्हिक्टरी साईन दाखवलं. अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत.