IPL 2022 World Cup 2011 Coincidence: आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाने पहिल्या हंगामातच राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्स राखून पराभव केला. ११ वर्षांपूर्वी २०११ मध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखाली World Cup जिंकला होता. या संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. भारताचा तो विजय आणि गुजरातचा हा विजय यात योगायोगाने अनेक गोष्टीत साम्य दिसून आलं.
जर्सी नंबर ७ चा जलवा
गुजरात टायटन्सची ७ नंबरची जर्सी परिधान करणाऱ्या शुभमन गिलने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉयविरुद्ध त्याने १९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. या षटकारासह गुजरातने विजेतेपद पटकावले. २०११ मध्येही असेच काहीसे घडले होते. भारतासाठी ७ नंबरची जर्सी परिधान करणार्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार ठोकत भारतीय संघाला ट्रॉफी मिळवून दिली होती.
नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांचा विजयी जल्लोष
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन होते. आणि आशिष नेहरा संघातील महत्त्वाचा गोलंदाज होता. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दुखापतीमुळे नेहरा अंतिम सामन्याला मुकला होता. दोघांनीही भारतीय विजयाचा आनंद साजरा केला होता. रविवारी देखील हे दोघेही गुजरातसोबत होते. आशिष नेहरा संघाचा मुख्य प्रशिक्षक तर गॅरी कर्स्टन संघाचे मेंटॉर म्हणून विजयाचा जल्लोष करताना दिसले.
संगकारा आणि मलिंगाचा संघ हरला
२०११ मध्ये भारतीय संघाने ज्या श्रीलंकेचा पराभव केला, त्यात कुमार संगकारा त्यांचा कर्णधार होता. दुसरीकडे, लसिथ मलिंगा हा संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज होता. यावेळीही हे दोघे राजस्थान रॉयल्ससोबत होते. संगकारा हा संघाचा क्रिकेट संचालक आहे आणि मलिंगा गोलंदाजी प्रशिक्षक होता. या दोघांना काल कोचिंग स्टाफचा भाग असताना पराभव पचवावा लागला.