IPL 2022 Finals RR vs GT : २००८ नंतर राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आयपीएल फायनल खेळणार आहे. आयपीएल २०२२मध्ये प्रथमच खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans) अंतिम फेरीत प्रवेश करून विक्रमी कामगिरी केली आणि आता त्यांच्यासमोर RR चे आव्हान आहे. २००८मध्ये शेन वॉर्नच्या ( Shane Warne) नेतृत्वाखाली राजस्थानने जेतेपद पटकावले होते आणि १४ वर्षांनंतर त्यांना दुसरे जेतेपद जिंकण्याची संधी आहे. पण, ही ऐतिहासिक भरारी पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन दिग्गज वॉर्न या जगात नाही. जेतेपद पटकावून वॉर्नला श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार RRच्या खेळाडूंनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा सामना हा भावनिकही असणार आहे. IPL 2022 Finals पूर्वी RRने अनेकांची मनं जिंकली आहेत.
राजस्थान रॉयल्सने २००८च्या विजेत्या संघातील खेळाडूंना फायनलसाठी आमंत्रण दिले आहे. सामन्याआधी राजस्थान रॉयल्सकडून या सर्व खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. TOI ने दिलेल्या वृत्तानुसार २००८च्या विजेत्या संघातील मुनाफ पटेल, युसूफ पठाण, स्वप्निल आसनोडकर, दिनेश साळुंखे, सिद्धार्थ त्रिवेदी आणि रवींद्र जडेजा हे या सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. परदेशी खेळाडू शेन वॉटसन, दिमित्री मास्कारेन्हास, कामरान अकमल, डॅरेन लेहमन आणि सोहैल तन्वीर हे काही कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. ग्रॅमी स्मिथ जो आता आयपीएल कॉमेंट्री टीमचा सदस्य आहे, तो यावेळी उपस्थित असेल.
२००८च्या RR संघातील सदस्य असलेल्या ग्रॅमी स्मिथने ट्विट केले की,''मला आमंत्रण मिळालं आहे आणि मी फायनलसाठी उपस्थित राहणार आहे.'' राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स सेंटरचे प्रमुख रोमी भांडेर यांनी म्हटले की,''आम्ही एक कुटुंब आहे आणि एकदा तुम्ही या कुटुंबात दाखल होता, तर तुम्ही कायमचे 'रॉयल' फॅमिलीचे सदस्य बनता. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी यावेळी उपस्थित रहावं, अशी आमची इच्छा आहे.''
२००८च्या आयपीएल विजेत्या RR संघात कोण कोण होते?
- मुनाफ पटेल, युसूफ पठाणे, स्वप्निल आसनोडकर, दिनेश साळुंखे, सिद्धार्थ त्रिवेदी आणि रवींद्र जडेजा
- ग्रॅमी स्मिथ, शेन वॉर्न, शेन वॉर्न, शेन वॉटसन, दिमित्री मास्कारेन्हास, कामरान अकमल, डॅरेन लेहमन आणि सोहैल तन्वीर