Mumbai Indians, IPL Flashback: आजच्या जगात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. क्रिकेटर्स इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर खूप सक्रिय असतात आणि अधूनमधून चाहत्यांशी संवाद साधतात. सोशल मीडिया जेव्हा अगदीच नवीन होतं तेव्हा अनेकांना त्याची व्याप्ती माहिती नव्हती. त्यामुळेच काही क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर अत्यंत लाजिरवाण्या क्षणांना सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्स संघाच्या एका खेळाडूनेही माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि बॉलिवूडचा किंग खान (Shahrukh Khan) या दोघांबद्दल काही कमेंट केल्या होत्या.
मुंबई इंडियन्सला मोक्याच्या क्षणी षटकार मारून सामना जिंकवून देणारा फलंदाज आदित्य तारे (Aditya Tare) याने ट्विटरवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा मालक शाहरुख खान आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीबद्दल असं काही लिहिलं होतं, की ती गोष्ट आज जरी या दोघांच्या चाहत्यांना दाखवली तर त्यांचा तिळपापड झाल्याशिवाय राहणार नाही. IPL 2012 मध्ये शाहरुख खान आणि वानखेडे स्टेडियममधील कर्मचाऱ्यांमध्ये भांडण झाल्यानंतर शाहरूखला वानखेडे स्टेडियमवर आजीवन बंदी घालण्यात आली. त्यावेळी आदित्य तारेने ट्विट करत थेट शाहरूखला दारूडा संबोधलं होतं.
याशिवाय, आदित्य तारेने आणखी एका ट्विटमध्ये कमाल आर खानला शिवीगाळ करताना एमएस धोनीबद्दलही अपशब्द लिहिले होते.
या दोन ट्वीट्सवरून सोशल मीडियावर बराच वादंग झाला. आदित्य तारेने नंतर हे दोन्ही ट्विट डिलीट केले, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. कारण त्याच्या दोन्ही ट्विटचा स्क्रीनशॉट चाहत्यांनी खूप व्हायरल केला होता.