नवी दिल्ली-
२६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२२ मध्ये केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज लोकेश राहुलनं भारतीय संघात आपलं स्थान आधीच पक्कं केलं आहे. आयपीएल 2020 मध्ये त्यानं शानदार फलंदाजी करताना ऑरेंज कॅप जिंकली. पण कर्णधार म्हणून तो फारसा यशस्वी ठरला नाही. पण यावेळी त्याला लखनौचं कर्णधारपद भूषवताना काहीतरी नवीन करायचं आहे. लखनौ सुपर जायंट्सची कमान हाती घेण्यापूर्वी केएल राहुल पंजाब किंग्जचा कर्णधार होता.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीवीर आकाश चोप्रानं केएल राहुलचं मूल्यांकन केलं आहे. यष्टिरक्षक फलंदाज राहुलसाठी हे काम सोपं नसेल, असं तो म्हणाला. पंजाब किंग्जचं नेतृत्व करताना त्याची फलंदाजी तुलनेनं संथ होती असं आकाशला वाटतं. त्याच्या नवीन फ्रँचायझीसाठी खेळताना त्याला त्यावर मात करणं आवश्यक आहे, असंही आकाश चोप्रा म्हणाला.
पंजाबसाठी संथ खेळलाआपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाशनं राहुलकडे हार्दिक पांड्यासारखी क्लीन स्लेट फलंदाजी आहे. पण तो पंजाब किंग्जकडून संथ खेळत होता. कारण संघ तसा होता. पण यावेळी त्याच्यासाठी एक मोठं आव्हान असेल, असं म्हटलं आहे. तो पुढे म्हणाला, आता मोकळेपणानं खेळायला हवं, आता नाही तर कधीच नाही, करो किंवा मरो, हे महत्त्वाचं आहे. गौतम गंभीर आणि अँडी फ्लॉवरसारखे उत्तम मार्गदर्शक सोबत आहेत आणि केएल राहुल एक कर्णधार आहे, महान खेळाडू आहे, असंही आकाश चोप्रा म्हणाला.
असा आहे राहुलचा विक्रमकेएल राहुलने आतापर्यंत 94 आयपीएल सामने खेळले आहेत ज्यात त्याने 3273 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतकं झळकावली आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याची सरासरी ५५.८३ इतकी आहे. आयपीएल 2020 मध्ये त्याने शानदार फलंदाजी करताना 14 सामन्यांमध्ये 670 धावा केल्या होत्या. गेल्या मोसमात त्याने 13 सामन्यांत 626 धावा केल्या होत्या. IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पहिला सामना 28 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.