भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचं कौतुक केलं. ऋतुराज गायकवाडनं अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जसाठी खूप चांगली खेळी खेळली आणि जबरदस्त ९९ धावा केल्या. यामुळे CSK ला सामन्यात विजय मिळवता आला. सध्या चेन्नई सुपर किंग्स हे प्लेऑफच्या शर्यतीतही आहेत. चेन्नईनं १३ धावांनी सामन्यात विजय मिळवला. दरम्यान, ऋतुराज गायकवाडला भारतीय कसोटी संघात स्थान मिळायला हवं, असं मत यानंतर वेंगसरकर यांनी व्यक्त केलं.
पुण्यातील सामन्यात खेळताना ऋतुराजचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. त्यानं त्याचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याच्यासोबत १८२ धावांची जबरदस्त भागीदारी केली. गायकवाडला १८ व्या षटकात टी नटराजननं बाद केलं. त्याने केवळ ५७ चेंडूत ९९ धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सनरायझर्स हैदराबादच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करण्याच्या ऋतुराज गायकवाडच्या क्षमतेचं वेंगसरकर यांनी कौतुक केलं.
त्यानं उमरान मलिकच्या गोलंदाजीचा सामना अतिशय उत्तमरित्या केला. गेल्या सामन्यात उमराननं पाच विकेट्स घेतल्या होत्या. "आपल्या यापूर्वीच्या सामन्यात उमरान मलिकनं काही फलंदाजांना माघारी धाडलं होतं. परंतु या सामन्यात ऋतुराजनं उत्तम खेळी केली," असं वेंगसरकर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्यानं विजयी खेळी केली यामुळे मला आनंद झाला आहे. त्यानं योग्य क्रिकेट शॉट खेळले. त्याच्या खेळात कोणत्याही चुकीच्या गोष्टी नव्हत्या. यापूर्वीही त्यानं या फॉर्मेटमध्ये स्वत:ला जगासमोर सिद्ध केलं आहे. तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात यशस्वी होईल याचा मला विश्वास आहे. तो कसोटी सामन्यांसाठी अतियशय अनुकूल दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
Web Title: ipl 2022 former indian captain selector dilip vengsarkar says selectors must admit ruturaj gaikwad in test team india
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.