Virat Kohli thought of leaving RCB : विराट कोहली हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू असेल की तो एकाच फ्रँचायझीकडून इतकी वर्ष खेळतोय. महेंद्रसिंग धोनीलाही ( MS Dhoni) दोन वर्ष पुणे फ्रँचायझीकडून खेळावे लागले होते. त्यावेळेस चेन्नई सुपर किंग्सवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली गेली होती. पण, कोहलीलाही आपण दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळावे असे वाटले होते. विराटने RCB पोडकास्टवर दानिश सैत याच्याशी बोलताना हा धक्कादायक खुलासा केला.
Royal Challengers Bangaloreच्या पोडकास्टवर विराटने त्याच्या मनात संघ बदलण्याचा विचार आल्याचे सांगितले, परंतु त्यानं तसे केले नाही. RCBकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असूनही त्याच्या नावावर एकही आयपीएल जेतेपद नाही. आयपीएल २०२१पूर्वी विराटने RCBचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. विराट म्हणाला,''खरं सांगायचं तर मी दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा विचार केला होता आणि अन्य फ्रँचायझींनी मला ऑक्शनमध्ये दाखल होण्यासही सांगितले होते. पण, मी त्यानंतर पुन्हा विचार केला. असे अनेक दिग्गज आहेत, की ज्यांनी ट्रॉफी जिंकल्या आहेत, परंतु तुम्हाला तसं कोणी संबोधत नाही. आयपीएल चॅम्पियन किंवा वर्ल्ड कप चॅम्पियन असेही कुणी बोलत नाही.''
'' अखेर तू आयपीएल ट्रॉफी जिंकली, यापेक्षा माझ्यासाठी RCBसोबतची प्रामाणिकता महत्त्वाची आहे. तुम्हाला पाच मिनिटांसाठी बरं वाटतं आणि मग तुम्ही दुस-या कोणत्या तरी समस्येने त्रस्त व्हाल,''असे विराट म्हणाला. विराटने २०७ आयपीएल सामन्यांत ३७.३९च्या सरासरीने ६२८३ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकं व ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. तो पुढे म्हणाला, ''आयपीएल ट्रॉफी जिंकलो नाही, म्हणजे तो माझ्यासाठी जगाचा शेवट ठरत नाही. RCBने पहिली तीन वर्ष मला संधी दिली आणि माझ्यावर विश्वास टाकला. हे माझ्यासाठी खूप खास होतं.''
''RCBशिवाय मी स्वतःला अन्य संघात पाहू शकत नाही, त्यामुळेच मी म्हणालेलो की अखेरपर्यंत मी RCBकडूनच खेळणार. या शहराने मला भरभरून प्रेम दिलं. हे माझं घरच आहे,''असेही कोहलीने सांगितले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस ( ७ कोटी), हर्षल पटेल ( १०.७५ कोटी), वानींदू हसरंगा ( १२.२५ कोटी), दिनेश कार्तिक ( ५.५० कोटी), जोश हेझलवूड ( ७.७५ कोटी), शाहबाज अहमद ( २.४० कोटी) , अनुज रावत ( ३.४० कोटी), आकाश दीप ( २० लाख), महिपाल लोमरोर ( ९५ लाख), फिन अॅलेन ( ८० लाख), शेर्फाने रुथरफोर्ड ( १ कोटी), जेसन बेहरेनडॉर्फ ( ७५ लाख), सुयश प्रभुदेसाई ( ३० लाख), चामा मिलिंद ( २५ लाख), अनीश्वर गौतम ( २० लाख), लवनिथ सिसोदिया ( २० लाख), सिद्धार्थ कौल ( ७५ लाख), कर्ण शर्मा ( ५० लाख), डेव्हिड विली ( २ कोटी).