नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या जागी राहुल द्रविडला संघाचा नवीन प्रशिक्षक बनवण्यात आले. दरम्यान, यानंतर रवी शास्त्री पुढील वर्षी होणाऱ्या IPLमध्ये अहमदाबाद संघाचे प्रशिक्षक होणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, आता स्वतः शास्त्री यांनी त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
कुठल्याही संघाचे प्रशिक्षकपद न घेता शास्त्री आता समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे. शास्त्री हे सर्वोत्तम समालोचक म्हणून ओळखले जातात. टीम इंडियात येण्यापूर्वी ते समालोचक म्हणून काम पाहायचे. त्यामुळेच आता IPL 2022 मध्ये शास्त्री समालोचन करताना दिसू शकतात.
मला आता ताजी हवा पाहिजे
शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेस ई-अड्डामध्ये बोलताना सांगितले की, मी नुकताच बायो-बबलमधून बाहेर आलो आहे. मला आता लगेच कुठल्याही कामात गुंतायचे नाही. मला आता ताजी हवा हवी आहे. मी या विषयावर (कोच बनणे) कोणाशीही चर्चा केलेली नाही. माझ्या संघातील कोणाशीही बोलणे नाही. मला आता फक्त विश्रांती घ्यायची आहे. मी नक्कीच टेलिव्हिजन आणि मीडियाकडे परत जाईन. हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते."
कोण होणार अहमदाबादचा ?
दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनला अहमदाबादचे प्रशिक्षक बनवले जाण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडिया व्यतिरिक्त, गॅरीला दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, कर्स्टन अहमदाबाद संघाचे कोच बनू शकतात. या यादीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचेही नाव आघाडीवर आहे.