IPL 2022 सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू या स्पर्धेत उशिरा सामील होतील अशी बातमी होती. कारण ते बांगलादेशविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिकेत खेळणार आहेत. या बातमीमुळे आयपीएल फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली होती. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेने आपला कसोटी संघ जाहीर केल्याने आयपीएल फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला आहे. आफ्रिकेने निवडलेल्या संघात IPL 2022 मध्ये खेळणाऱ्या कोणत्याही दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची नावे नाहीयेत. दक्षिण आफ्रिकेने ३१ मार्चपासून सुरू होणार्या बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय कसोटी संघ जाहीर केला. त्यात IPL खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश न केल्याने आता आफ्रिकन खेळाडू पहिल्या सामन्यापासून आपापल्या IPL संघासोबत असणार आहेत.
दक्षिण आफ्रिका बांगलादेश विरूद्धच्या मालिकेत कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि मार्को जेन्सेनसारख्या वेगवान गोलंदाजांशिवाय खेळणार आहे. तसेच, या कसोटी मालिकेत एडन मार्कराम, रसी व्हॅन डर डुसेन यांसारख्या फलंदाजांचाही समावेश करण्यात आलेला नाही. मधल्या फळीतील फलंदाज खाया झोंडोला प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. संघात वेगवान गोलंदाज डॅरिन डुपाव्हिलॉनच्या रूपानेही एका नव्या चेहऱ्याचा समावेश झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या मुद्द्यावर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली होती. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि सध्याचे क्रिकेट संचालक ग्रॅम स्मिथ यांनी गुरुवारी सांगितले की, IPL मध्ये खेळल्याने खेळाडू देशद्रोही ठरत नाहीत. या विधानावरून हे स्पष्ट झाले की दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू IPL 2022च्या सामन्यांना अनुपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्ससाठी वाईट बातमी अशी आहे की पाठीच्या दुखण्यामुळे एन्रीक नॉर्खिया निवडीसाठी उपलब्ध नव्हता. आयपीएलमध्येही त्याचं खेळणं संशयास्पद असणार आहे.