इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने ( Punjab Kings) २०६ धावांचे लक्ष्य ५ विकेट्स व ६ चेंडू राखून पार करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( Royal Challengers Banglore) धक्का दिला. ओडिन स्मिथ व शाहरूख खान यांनी हातातून निसटलेला सामना खेचून आणला आणि कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या मयांक अग्रवालला ( Mayank Agarwal) विजयी भेट दिली. पण, या सामन्यात मयांकची एक कृती चर्चेचा विषय बनली आहे. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील स्टार राज बावा ( Raja Bawa) याच्यासोबत तो जे वागला त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात दमदार खेळ केला. फॅफ ५७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांच्यासह ८८ धावांवर माघारी परतला. दिनेश कार्तिकने १४ चेंडूंत ३२ धावा, तर विराट कोहलीने २९ चेंडूंत ४१ धावा चोपल्या. अनुज २१ धावांवर बाद झाला. पंजाबकडूनही जबरदस्त पलटवार झाला. शिखर धवन व मयांक अग्रवाल या जोडीने पहिल्या विकेटसाठी १० च्या सरासरीने ७१ धावांची भागीदारी केली. मयांक २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर बाद झाला. शिखरने २९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. भानुका राजपक्षाने २२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावा चोपल्या. मोहम्मद सिराजने त्याला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर राज बावाला पायचीत केले.
पदार्पणात शून्यावर बाद होऊन पेव्हेलियनमध्ये परतलेल्या राज बावाकडे कर्णधार मयांकने धाव घेतली आणि त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला धीर दिला. कर्णधार म्हणून युवा खेळाडूंचे मनोबल उंचावत ठेवणे हे महत्त्वाचे आहे याची जाण मयांकला होती आणि त्याने म्हणून बावाला हताश होऊ नकोस असेच सांगितले.
पाहा व्हिडीओ...१८ चेंडूंत ३६ धावा हव्या असताना जीवदान दिलेल्या स्मिथने १८व्या षटकात सिराजच्या पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार व एक चौकार खेचून सामन्याचे चित्र बदलले. स्मिथने ८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद २५ धावा केल्या. शाहरुखने नाबाद २४ धावा करून ५ विकेट्स व ६ चेंडू राखून पंजाबला विजय मिळवून दिला.