IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : संथ खेळपट्टीवर लखनौ सुपर जायंट्सनाही धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागेल असा अंदाज होता. पण, लोकेश राहुलने ( KL Rahul) सर्व अंदाज खोटे ठरवले. आतापर्यंत संथ स्ट्राईक रेटवरून टीकेचा सामना करावा लागणाऱ्या KL Rahul ने आज गुजरात टायटन्सविरुद्ध दमदार फलंदाजी केली. मोहम्मद शमीचं पहिलं षटक निर्धाव खेळल्यानंतर लोकेश व कायले मायर्स यांनी ३३ चेंडूंत ५० धावा फलकावर चढवल्या.
गुजरात टायटन्सच्या फलंदाजांचा चांगलाच कस लागला. लखनौ सुपर जायंट्सने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलताना गतविजेत्यांना ६ बाद १३५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. वृद्धीमान साहाने (४७) चांगली फलंदाजी केली, तर हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) मैदानावर टीकूनही GTला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकला नाही. कृणाल पांड्याने ( ४-०-१६-२) उत्तम गोलंदाजी केली. हार्दिक ५० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. मार्कस स्टॉयनिसनेही ३-०-२०-२ अशी स्पेल टाकली.
मोहम्मद शमीने पहिले षटक निर्धाव टाकले. खेळपट्टीचा अंदाज घेता LSGला या धावा सहज करता येणाऱ्या नव्हत्या. पण, शमीच्या पुढच्याच षटकांत लोकेश राहुलने सलग तीन चौकार खेचून १४ धावा कुटल्या. त्याने राशीद खानचेही दोन खणखणीत चौकाराने स्वागत केले. लोकेश हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ( इनिंग्ज) ७००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. जगात त्याचा क्रमांका बाबर आजम ( १८७) व ख्रिस गेल ( १९२) यांच्यानंतर तिसरा येतो. लोकेशने १९७ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडताना विराट कोहलीचा ( २१२) विक्रम मोडला. त्यानंतर शिखर धवन ( २४६), सुरेश रैना ( २५१), रोहित शर्मा ( २५८) आणि रॉबिन उथप्पा ( २७१) यांचा क्रमांक येतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"