IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स ( GT vs PBKS) यांच्यातल्या सामन्याचा पहिला डाव रंगतदार झाला. पंजाबने दोन विकेट्स पटापट गमावल्यानंतर शिखर धवन व लाएम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone ) यांनी डाव सावरला. पण, दर्शन नळकांडेने ( Darshan Nalkande ) सलग दोन विकेट्स घेत सामना पुन्हा फिरवला. लिव्हिंगस्टोन व शाहरुख खान गुजरातसाठी डोकेदुखी ठरत होते आणि त्यांना राशिद खानने ( Rashid Khan) एकाच षटकात माघारी पाठवून गुजरातला पुन्हा ट्रॅकवर आणले. पंजाबने अखेरच्या ५ षटकांत फक्त ३७ धावांत ४ विकेट्स गमावल्या.
पंजाब किंग्सची सुरुवात फार चांगली झाली नाही. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मयांक अग्रवाल ( ५) याला बाद केले. आज पहिलाच सामना खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोचा अडथळा ल्युकी फर्ग्युसनने दूर केला, राहुल तेवातियाने सुरेख झेल टिपला. शिखर धवन व लिव्हिंगस्टोन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ५२ धावा जोडल्या. धवन ३५ धावांवर राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूत ५०+ धावा करून यंदाच्या आयपीएलमधील दुसरे जलद अर्धशतक पूर्ण केले. जितेश शर्माने ताबडतोड ११ चेंडूंत २३ धावा ( १ चौकार व २ षटकार) कुटल्या. पदार्पणवीर दर्शन नळकांडेने त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. दर्शनने पुढच्याच चेंडूवर ओडीन स्मिथला ( ०) बाद करून पंजाबला मोठा धक्का दिला. १५ षटकांत पंजाबने ५ बाद १५२ धावा केल्या होत्या.
१६व्या षटकात राशिद खानने कमाल केली. त्याने खतरनाक लिव्हिंगस्टोन व शाहरूख खान यांना एकामागोमाग बाद केले. लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावा केल्या, तर शाहरूख ८ चेंडूंत २ षटकारांसह १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर कागिसो रबाडा ( १) रन आऊट झाल्याने पंजाब पुन्हा बॅकफूटवर फेकले गेले. मोहम्मद शमीने सामन्यातील ९वी विकेट घेताना वैभव अरोराला बाद केले. राहुल चहरने काही आडवे-तिडवे फटके मारून पंजाबची धावसंख्या पटापट वाढवली. चहरने १४ चेंडूंत नाबाद २२, तर अर्षदीप सिंगने १० धावा केल्या. पंजाबने ९ बाद १८९ धावा केल्या.