IPL 2022, Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्सला ( GT) आज लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर त्यांचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. २० वर्षीय साई सुदर्शनने त्यांना सारवले. पण, त्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी सहज विजय मिळवला. शिखर धवन व भानुका राजपक्षा यानी गुजरातच्या हातून सामना खेचून आणला. त्यानंतर लाएम लिव्हिंगस्टोनने ( Liam Livingstone ) एका षटकात निकाल लावला.
पंजाब किंग्सने आज जॉनी बेअरस्टोला सलामीला पाठवले, परंतु त्यांचा हा डाव फसला. तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीला मारलेला उत्तुंग फटका प्रदीप सांगवानने झेलला. पंजाबला १० धावेवर पहिला धक्का बसला. शिखर धवन संयमाने खेळत होता. त्याने ९ धावा करताच याही पर्वात ३०० धावांचा पल्ला ओलांडला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक १३ वेळा पर्वात ३००+ धावा करण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. विराट कोहलीला १२ वेळा हा पराक्रम करता आला आहे. बेअरस्टोच्या विकेटचा धवनच्या खेळीवर काहीच परिणाम झाला नाही आणि त्याने अल्झारी जोसेफच्या चौथ्या षटकात १२ धावा चोपल्या. त्याला भानुका राजपक्षाची उत्तम साथ मिळाली आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
धवनने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे ४७ वे अर्धशतक ठरले. पण, ल्युकी फर्ग्युसनने पंजाबची ही सेट जोडी तोडली. राजपक्षा २८ चेंडूंत ५ चौकार १ षटकार खेचून ४० धावांवर LBW झाला आणि धवनसह ५९ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. धवनची फटकेबाजी सुरू होती. १६व्या षटकात मोहम्मद शमीला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि लाएम लिव्हिंगस्टोनने ११७ मीटर लांब षटकार खेचू त्याचे स्वागत केले. पुढील दोन चेंडूही षटकार खेचले. शमीच्या त्या षटकात २८ धावा चोपून लिव्हिंगस्टोनने पंजाबचा विजय पक्का केला. पंजाबने ८ विकेट्स व २४ चेंडू राखून हा सामना जिंकला. धवन ५३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६२ धावांवर नाबाद राहिला, तर लिव्हिंग्स्टोनने १० चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ३० धावांची नाबाद खेळी केली. पंजाबने १६ षटकांत २ बाद १४५ धावा करून विजय पक्का केला.
गुजरातने ( GT vs PBKS) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय फसला, पांड्यासह गुजरातचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या ६७ धावांवर माघारी परतले. वृद्धीमान सहा ( २१), शुबमन गिल ( ९), हार्दिक पांड्या ( १) व डेव्हिड मिलर ( ११) हे अपयशी ठरले. साई सुदर्शन चांगला खेळला. त्याने तेवातियासह ४५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. कागिसोने १७व्या षटकात ही भागादारी संपुष्टात आणली. त्याने सलग दोन चेंडूंत तेवातिया ( ११) व राशिद खान (०) यांना माघारी पाठवले. सुदर्शन ५० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. गुजरातने ८ बाद १४३ धावा उभ्या केल्या. कागिसोने ३३ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2022, GT vs PBKS Live Updates : Shikhar Dhawan & Bhanuka Rajapaksa taken the game away from Gujarat Titans, 6,6,6,4,2,4 by Liam Livingstone and won it for Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.