IPL 2022, Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्सला ( GT) आज लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर त्यांचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. २० वर्षीय साई सुदर्शनने त्यांना सारवले. पण, त्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी सहज विजय मिळवला. शिखर धवन व भानुका राजपक्षा यानी गुजरातच्या हातून सामना खेचून आणला. त्यानंतर लाएम लिव्हिंगस्टोनने ( Liam Livingstone ) एका षटकात निकाल लावला.
पंजाब किंग्सने आज जॉनी बेअरस्टोला सलामीला पाठवले, परंतु त्यांचा हा डाव फसला. तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीला मारलेला उत्तुंग फटका प्रदीप सांगवानने झेलला. पंजाबला १० धावेवर पहिला धक्का बसला. शिखर धवन संयमाने खेळत होता. त्याने ९ धावा करताच याही पर्वात ३०० धावांचा पल्ला ओलांडला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक १३ वेळा पर्वात ३००+ धावा करण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. विराट कोहलीला १२ वेळा हा पराक्रम करता आला आहे. बेअरस्टोच्या विकेटचा धवनच्या खेळीवर काहीच परिणाम झाला नाही आणि त्याने अल्झारी जोसेफच्या चौथ्या षटकात १२ धावा चोपल्या. त्याला भानुका राजपक्षाची उत्तम साथ मिळाली आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
गुजरातने ( GT vs PBKS) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय फसला, पांड्यासह गुजरातचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या ६७ धावांवर माघारी परतले. वृद्धीमान सहा ( २१), शुबमन गिल ( ९), हार्दिक पांड्या ( १) व डेव्हिड मिलर ( ११) हे अपयशी ठरले. साई सुदर्शन चांगला खेळला. त्याने तेवातियासह ४५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. कागिसोने १७व्या षटकात ही भागादारी संपुष्टात आणली. त्याने सलग दोन चेंडूंत तेवातिया ( ११) व राशिद खान (०) यांना माघारी पाठवले. सुदर्शन ५० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. गुजरातने ८ बाद १४३ धावा उभ्या केल्या. कागिसोने ३३ धावांत ४ विकेट्स घेतल्या.