IPL 2022, Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्सचे ( GT) स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर पंजाब किंग्स ( PBKS) सामन्यावर मजबूत पकड घेतील असे वाटले होते. पण, तामिळनाडूच्या २० वर्षीय साई सुदर्शनने ( Sai Sudharsan) त्यांना घाम फोडला. कागिसो रबाडा ( Kagiso Rabada) सारखा गोलंदाज समोर असूनही साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी केली. घरातूनच खेळाचे बाळकडू मिळालेल्या सुदर्शनच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने पंजाबसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. रबाडाने ४ विकेट्स घेतल्या.
पांड्या सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. १ धावेवर रिषी धवनने त्याची विकेट घेतली. गुजरातचे आघाडीचे तीन फलंदाज ४४ धावांवर माघारी परतले. साई सुदर्शन व डेव्हिड मिलर यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, लाएम लिव्हिंगस्टोनच्या फिरकीच्या जाळ्यात मिलर अडकला अन् ११ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. सुदर्शन चांगला खेळला. त्याने तेवातियासह ४५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. कागिसोने १७व्या षटकात ही भागादारी संपुष्टात आणली. त्याने सलग दोन चेंडूंत तेवातिया ( ११) व राशिद खान (०) यांना माघारी पाठवले. प्रदीप सांगवानने मात्र रबाडाला हॅटट्रिक मिळवू दिली नाही.
कोण आहे साई सुदर्शन?तामिळनाडू प्रीमिअर लीग गाजवणाऱ्या साई सुदर्शनला गुजरात टायटन्सने करारबद्ध केले. विजय शंकर याने माघार घेतल्यानंतर सुदर्शनने आयपीएलमध्ये पदार्पण झाले. तामिळनाडू प्रीमिअर लीग २०१९-२०मध्ये त्याने ५२.९२च्या सरासरीने सर्वाधिक ६३५ धावा केल्या होत्या. त्याच्या वडिलांनी South Asian Games स्पर्धेत भारताच्या अॅथलेटिक्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते, तर त्याची आई राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटू होती.