मुंबई :गुजरात टायटन्सने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान भक्कम करताना चेन्नई सुपरकिंग्जचा ७ गड्यांनी धुव्वा उडविला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला २० षटकांत केवळ ५ बाद १३३ धावाच करता आल्या. गुजरातने १९.१ षटकांत ३ बाद १३७ धावा करीत दणदणीत विजय मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल-वृद्धिमान साहा यांनी ५९ धावांची सलामी देत गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, आयपीएल पदार्पण करीत असलेल्या मथीशा पथिराना याने आपल्या स्लिंगा स्टाईलने गिलला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर गुजरातची धावगती काहीशी मंदावली; परंतु, साहाने अखेरपर्यंत टिकून राहताना ५७ चेंडूंत नाबाद ६७ धावा करत ८ चौकारांसह एक षटकार मारला. त्याने एक बाजू खंबीरपणे लावून धरल्याने गुजरातचा विजय सोपा झाला. पथिरानाने २४ धावांत २ बळी घेत प्रभावी मारा केला.
त्याआधी, चांगल्या स्थितीतून दडपणाखाली आलेल्या चेन्नईने समाधानकारक मजल मारली. डीवोन कॉन्वे (५) अपयशी ठरल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि मोइन अली यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी केली. ऋतुराजने ४९ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ५३ धावा केल्या. मोइनने १७ चेंडूंत २ षटकारांसह २१ धावा केल्या. नारायण जगदीसनने ३३ चेंडूंत नाबाद ३९ धावा करत ३ चौकार व एक षटकार मारला. या तिघांचा अपवाद वगळता चेन्नईची फलंदाजी अपयशी ठरली. अखेरच्या ५ षटकांत चेन्नईने केवळ २४ धावा केल्या. मोहम्मद शमीने २, तर राशीद खान, अल्झारी जोसेफ आणि साई किशोर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
- डीवोन कॉन्वेने टी-२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या.
- चेन्नईला पहिल्यांदाच अखेरच्या ५ षटकांमध्ये एकदाही चेंडू सीमारेषेबाहेर मारता आला नाही.
सायमंड्सला श्रद्धांजली
वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा दिवंगत अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली देण्यात आली. चेन्नईच्या डावातील पहिले षटक झाल्यानंतर स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर सायमंड्सचा फोटो झळकावण्यात आला. ‘खेळामधील तुझी अनुपस्थिती आम्हाला कायमच जाणवेल. रेस्ट इन पीस अँड्र्यू सायमंड्स,’ अशा शब्दांमध्ये आयपीएलमध्ये सायमंड्सला श्रद्धांजली वाहिली. सामन्यादरम्यान चेन्नई आणि गुजरातच्या खेळाडूंनी दंडाला काळी फीत बांधून सायमंड्सला श्रद्धांजली दिली.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्ज : २० षटकांत ५ बाद १३३ धावा (ऋतुराज गायकवाड ५३, नारायण जगदीसन नाबाद ३९, मोइन अली २१; मोहम्मद शमी २/१९.) पराभूत वि. गुजरात टायटन्स : १९.१ षटकांत ३ बाद १३७ धावा (वृद्धिमान साहा नाबाद ६७, मॅथ्यू वेड २०, शुभमन गिल १८; मथीशा पथिराना २/२४.)