Hardik Pandya, IPL 2022: इतके वर्षे Mumbai Indians कडून खेळलेला हार्दिक पांड्या आता Gujarat Titans संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गुजरातच्या संघाने लिलावाच्या आधीच त्याला करारबद्ध करून घेतलं होतं. मात्र स्पर्धेच्या आधीच त्यांच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर म्हणून ज्या खेळाडूवर गुजरात संघाचा भरवसा होता, त्या इंग्लंडच्या जेसन रॉयने (Jason) संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली आहे.
इंग्लंडसाठी तडाखेबाज सलामी देणारा फलंदाज जेसन रॉय याने IPL 2022 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयला यंदाच्या मेगालिलावात २ कोटींच्या मूळ किमतीवर गुजरात संघाने ताफ्यात घेतलं होतं. शुबमन गिलच्या साथीने तो ओपनिंग करेल असा गुजरात संघाचा प्लॅन होता. पण सुमारे दोन महिने बायो-बबलमध्ये राहावं लागणार या भीतीने त्याने स्पर्धेतून आधीच माघार घेतली. तसेच आपल्या इन्स्टाग्रामवर त्याने ही घोषणा केल्यानंतर त्या पोस्टवरील कमेंट्सचा पर्यायही बंद ठेवला.
एका वृत्तानुसार, टायटन्स संघाने अद्याप जेसन रॉयचा बदली खेळाडू कोण असेल याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत जेसन रॉय खेळताना दिसला होता. क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघाकडून सर्वाधिक ३०३ धावाही त्याने केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता.
जेसन रॉयने दुसऱ्यांदा लिलावानंतर स्पर्धेतून घेतलीय माघार
जेसन रॉय याने दुसऱ्यांदा लिलावानंतर स्पर्धेतून माघार घेतली आहे. या आधी IPL 2020 मध्ये त्याला दीड कोटींच्या मूळ किमतीवर दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतलं होतं. त्यावेळीही त्याने वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार घेतली होती.