मुंबई : आयपीएलमध्ये हैदराबादवर सोमवारी विजय मिळवून देणारा वेगवान गोलंदाज आवेश खान लखनऊ सुपर जायंट्ससाठी ‘मॅचविनर’ ठरला. २४ धावात चार बळी घेत हा विजय त्याने आईला समर्पित केला. तो डी. वाय. पाटील मैदानावर खेळत असताना आई शबीहा खान मात्र इंदूरच्या इस्पितळात आहे. सामन्याआधी दिवसभर आवेशने सतत फोनवर आईशी संवाद साधला. आई म्हणाली, ‘तू माझी चिंता करू नकोस, खेळावर लक्ष केंद्रित कर’, आवेशने सामना संपल्यानंतरही आई कशी आहे, याची खबरबात जाणून घेतली.
आवेशचे वडील आशिक खान यांनी दिलेल्या माहितीनुसार आवेशच्या आईची तब्येत सुधारत आहे. पुढच्या तीन दिवसात त्यांना सुटी दिली जाईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आवेशच्या आईला दोन वर्षांपासून स्तनाचा कर्करोग आहे. त्यांच्यावर वारंवार किमोथेरपी होत असते. अलीकडे इन्फेक्शन झाले. त्यामुळे इस्पितळात हलविण्यात आले आहे. वडील आशिक खान हे आवेशने टाकलेले अखेरचे षटक पाहू शकले नाहीत. रोजा असल्याने त्यावेळी ते नमाज पठणासाठी गेले होते. सामना संपल्यानंतर मात्र त्यांनी मुलाची कामगिरी वेबसाईटवर पाहिली. आवेशला ‘गेमचेंजर’चा पुरस्कार मिळाला.
दडपणात बळी घेणे महत्त्वाचे
आवेश म्हणाला, ‘दडपणात गडी बाद करणे हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात गोलंदाजांवर मोठे दडपण असते. तुम्ही ते कसे झुगारून देता याला अधिक महत्त्व आहे. संघाचा मुख्य गोलंदाज आहे, हे मनातही आले नाही. मी नेहमीच संघासाठी बळी घेण्याच्या विचारात असतो. मुख्य गोलंदाज असेल तर स्वत:वर अनावश्यक दडपण येऊच द्यायचे नाही, असाही माझा प्रयत्न असतो.’
संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो याचा आनंद आहे. आधीच्या सामन्यात माझ्यावर ११ धावा रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, मात्र मी यशस्वी झालो नव्हतो. दुसऱ्या विजयात माझे योगदान मोलाचे ठरले, याचे अधिक समाधान असल्याचे आवेशने सांगितले.
Web Title: IPL 2022: 'I miss you ...' Awesh Khan dedicates victory to his mother in hospital
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.