इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या सीझनला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईनं चारवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. तर कोलकाता नाइट रायडर्सनंही दोन वेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यावेळी कोलकाताचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असणार आहे. तर रवींद्र जडेजाकडे प्रथमच चेन्नईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. यावेळी दोन नवीन संघही आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. पहिला लखनौ सुपर जायंट्स आणि दुसरा गुजरात टायटन्स. यामध्ये लखनौचे कर्णधारपद केएल राहुलकडे आहे, तर हार्दिक पांड्या गुजरातचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक ट्विट खूप व्हायरल होत आहे, 'जर बिहारची आयपीएल टीम असती तर त्याचे नाव काय असते?' यावरुन नुसती धमाल सुरू आहे.
ट्विटरवर @Nirdayiii या हँडलवर एक ट्विट करण्यात आलं आहे. "आयपीएलमध्ये बिहारचा संघ असता तर त्याचे नाव काय असतं? 'जिया हो बिहार के लाला' असं नक्कीच नसेल", असं गमतीनं म्हटलं आहे. मग काय नेटिझन्सना चघळण्यासाठी नवा विषय मिळाला आणि तुफान फटकेबाजी सुरू झाली. या ट्विटला सोशल मीडिया युजर्सनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि बिहारच्या संभाव्य संघाबद्दल मजेदार नावं सुचवली आहेत. एका यूझरनं 'पटना पँथर्स', 'दरभंगा डॅगर्स' आणि 'छपरा चॅम्प्स' अशी नावं सुचवली आहेत, तर दुसर्या युझरनं 'सत्तू सुपरचार्जर्स'सारखी मजेशीर नावं सुचवली आहेत.
त्याचप्रमाणे बिहारच्या टीमसाठी आणखी एका युजरनं धमाल नाव सुचवलं आहे. लिट्टी-चोखा बिहारमध्ये खूप प्रसिद्ध असल्यानं, वापरकर्त्यानं संघाचं नाव 'लिट्टी चोखा वॉरियर्स' असं सुचवले आहे, तर एका युझरनं संघाचं नाव 'ठेकुआ किंग्स' असं ठेवलं आहे.