मुंबई - इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामात पुन्हा एकदा कोरोनाने घुसखोरी केली आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत एक खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघालाच क्वारेंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीच्या संघाचा पुढचा सामना पुण्यात होणार आहे. त्यासाठी संघ रवाना होणार होता. मात्र दिल्लीच्या खेळाडूंना आता हॉटेलमध्येच थांबवण्यात आले आहे. आता सर्व खेळाडूंची दोन दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने कोरोना चाचणी होणार आहेत. त्यानंतर पुःढील निर्णय होणार आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार रिष पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे. हा सामना २० एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. त्यासाठी दिल्लीचा संघ हा १८ एप्रिल रोजी पुण्याला रवाना होणार होता. मात्र संघाला मुंहईतील हॉटेलमध्येच क्वारेंटाइन करण्यात आले आहे.
दिल्लीच्या संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. रिपोर्टनुसार पॅट्रिक यांच्यानंतर घेण्यात आलेल्या रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये दिल्लीच्या संघातील अजून एक खेळा़डू कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने मोठं पाऊल उचललं आहे. आता दोन दिवसांपर्यंत आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील पाऊल उचलले जाईल.
गेल्या आयपीएलच्या हंगामादरम्यान कोरोनामुळे स्पर्धा अर्ध्यावरच थांबवावी लागली होती. त्यानंतर स्पर्धेचा उत्तरार्ध हा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये खेळवला गेला होता. तर २०२० मध्ये आयपीएलचे सर्व सामने यूएईमध्ये खेळवले गेले होते.