इंडियन प्रीमियर लीग (IPL-2022) चा 15 वं सीझन सुरू आहे. जगभरातील क्रिकेट प्रेमी या लीगच्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सध्या क्रिकेटपटू मैदानावर चौकार, षटकार आणि गोलंदाजी करून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत, तर माजी क्रिकेटपटू कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्या बाजूनं मजेशीर पद्धतीनं सामन्याचं विश्लेषण करुन चाहत्यांना आनंद देत आहेत. यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला सुरेश रैना देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतो आहे. कॉमेंट्रीच्या आपल्या पहिल्याच अनुभवात सुरेश रैनासोबत एक गंभीर प्रकार घडला. सुरेश रैनाच्या एका वक्तव्यामुळे भर कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठाण संतापलेला पाहायला मिळाला. पण यामागेही एक वेगळीच मेख आहे.
इरफान पठाण आणि सुरेश रैना १ एप्रिल रोजी वेगळ्याच कारणानं प्रसिद्धीझोतात आले आहे. या तारखेला 'एप्रिल फूल डे' असंही म्हणतात. या संधीचा फायदा घेत इरफाननं रैनाची खिल्ली उडवली. मात्र, रैनाला हे समजण्यासाठी बराच वेळ लागला आणि तोपर्यंत वातावरण खूपच गंभीर झालं होतं. नंतर इरफाननं रैनाला मिठी मारली आणि त्यानं 'एप्रिल फूल' केल्याचं सांगितलं. त्यानंतर सुरेश रैनाच्या जीवात जीव आला.
नेमकं काय घडलं?कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याबाबत १ एप्रिल रोजी स्टार स्पोर्ट्सवरील टीव्ही स्टुडिओमध्ये चर्चा सुरू होती. यात दोन अँकर आणि इरफान पठाण व सुरेश रैना यांचा समावेश होता. सामन्यात पंजाब किंग्जचा संघ आपला 'फेव्हरेट' असून संघाच्या जमेच्या बाजून इरफान पठाण सांगत होता. याचवेळी रैनानं सर्वांना आठवण करून दिली की इरफान देखील पंजाबच्या संघासाठी खेळला आहे आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पंजाबच्या संघाची सहमालक आहे. रैनाच्या याच विधानावर इरफाननं आक्षेप घेतला. प्रत्येक वेळी एका महिलेचा अँगल चर्चेत आणण्याचं काहीच कारण नाही, हे साफ चुकीचं आहे, असं इरफाननं म्हटलं. इरफाननं इतकी बेमालूमपणे अभिनय केला की तो खरच आपल्या विधानानं दु:खी झालाय असं रैनाला वाटलं.
इरफान नंतर थेट लाइव्ह शोमधून बाजूला जाऊन बसला. रैना देखील त्याची समजूत काढण्यासाठी गेला आणि पुन्हा व्यासपीठाच्या दिशेनं इरफानला तो घेऊन आला. त्यानंतर इरफाननं रैनाला मिठी मारत सत्य काय ते सांगितलं. आज कोणता दिवस आहे याची आठवण करुन देत इरफाननं सुरेश रैनाचा एप्रिल फूल झाल्याचं म्हटलं. त्यानंतर रैनाच्या देखील जीवात जीव आला आणि वातावरण निवळलं.