नवी दिल्ली : आयपीएलच्या १५व्या पर्वात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करण्यास सज्ज असलेला अष्टपैलू हार्दिक पांड्या याचा खेळ आणि फिटनेसमध्ये सुधारणा झाली. जे आपल्या नियंत्रणात आहे, त्यावर अधिक भर देत असल्याचे मत २८ वर्षांच्या हार्दिकने शनिवारी व्यक्त केले. २०१९ला पाठीच्या दुखापतीची समस्या उद्भवल्यापासून हार्दिक फिटनेसमुळे त्रस्त आहे. याच कारणास्तव तो न्यूझीलंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघातून खेळू शकला नाही. आयपीएल वेबसाइटवर बोलताना तो म्हणाला, ‘मी तर कुटुंबीयांसोबत वेळ घालवत होतो. याशिवाय कठोर सरावाच्या बळावर चांगली तयारी करण्यावर भर देत होतो. या काळात माझ्यासाठी काय चांगले असेल याचा विचार करण्यास भरपूर वेळ होता.’ फेब्रुवारी आयपीएलच्या मेगा लिलावाआधी मुंबई संघाने रिटेन केले नाही. नंतर नवा संघ गुजरातने कर्णधारपदी निवड केली. याविषयी हार्दिक पुढे म्हणाला, ‘माझ्या मते हे माझे पुनरागमन नाही. कर्णधारपद काही वेगळे नसते. मी तर सकारात्मक मानसिकतेने खेळणार. फार पुढचा विचार करणार नाही. माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींचाच विचार करण्याची माझी वृत्ती आहे. माझ्या शरीराला अनुकूल असेल आणि संघाच्या यशात योगदान देता येईल, इतकेच मी करणार आहे.’ गुजरात टायटन्सला २८ मार्च रोजी लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील नवा संघ लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.
सहकाऱ्यांना मोकळीक‘मी सहकाऱ्यांना सुरक्षा आणि मनाप्रमाणे खेळण्याची सूट देऊ इच्छितो. गुजरात संघासाठी चांगली कामगिरी करू शकलो तर भविष्यात काही गोष्टी लाभदायी होऊ शकतील. सध्या मी केवळ एकाच गोष्टीवर लक्ष देत आहे, ते म्हणजे सहकारी खेळाडूंसाठी नेहमी कसे उपलब्ध राहता येईल.’
बीसीसीआयच्या केंद्रीय करारात हार्दिकची ए ग्रेडमधून सी ग्रेडमध्ये पदावनती झाली. त्याची एनसीएत नुकतीच फिटनेस चाचणी झाली. त्यात यो-यो टेस्ट उत्तीर्ण झाला. दीर्घकाळ खेळापासून दूर असल्याने हार्दिकला आयपीएलची प्रतीक्षा आहे.‘केवळ कठोर मेहनत तुम्हाला यशाची खात्री देऊ शकत नाही, योग्य प्रक्रियेतून मार्ग काढूनच यश मिळविता येते, निकाल फारसा महत्त्वपूर्ण नाही, हे मी शिकलो आहे. तीन महिन्यांच्या कठोर सरावानंतर प्रत्यक्षात मी कुठे आहे, हे तपासून पाहण्याची आयपीएलमध्ये संधी असेल.’- हार्दिक पांड्या