मुंबई - आयपीएलच्या २०२२ च्या हंगामातील पहिला आठवडा आता संपला आहे. या आठवड्यात काही अविस्मरणीय खेळी आणि अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयपीएलमधील सर्व संघांमध्ये चुरस पाहायला मिळत असून, खेळाडूंमध्येही ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी चढाओढ दिसत आहे. दरम्यान, आतापर्यंत फलंदाजीमध्ये मुंबईचा इशान किशन आणि राजस्थानचा जोस बटलर यांच्या समसमान १३५ धावा झाल्या आहेत. मात्र असं असलं तरी ऑरेंज कॅप मात्र इशान किशनच्या डोक्यावर विराजमान झाली आहे. आता त्यामागचं कारण समोर आलं आहे.
मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या इशान किशनने दोन सामन्यांमध्ये १३५ धावा जमवल्या असून, सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला मिळणारी ऑरेंज कॅप सध्या इशानकडे आहे. तर राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर याच्याही १३५ धावा झाल्या आहेत. मात्र इशानची फलंदाजीची सरासरी आणि स्टाईक रेट बटलरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ऑरेंज कॅप इशानकडे आहे.
इशान किशनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन अर्धशकते फटकावली आहेत. दुसरीकडे जोस बटलरने मुंबईविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. आयपीएलच्या या हंगामातील पहिला शतकवीर होण्याचा मान जोस बटलरने पटकावला आहे. दरम्यान, इशान किशनने दोन सामन्यात एकदा नाबाद राहत १३५ धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १४८.३५ एवढा राहिला आहे. तर जोस बटलरने दोन डावांत १३५ धावा केल्या असून, त्याची सरासरी ही ६७.५ आहे. तर बटलरचा स्ट्राईक रेट हा १४०.६२ आहे. ऑरेंज कॅपच्या यादीत आंद्रे रसेल ९५ धावांसह तिसऱ्या स्थानावर तर फाफ डू प्लेसी ९३ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. संजू सॅमसन ८५ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
पर्पल कॅपच्या यादीत उमेश यादवने ३ सामन्यांत ८ बळी टिपत पर्पल कॅप आपल्याकडे ठेवली आहे. या यादीत युझवेंद्र चहल ५ विकेट्सह दुसऱ्या स्थानावर आहे. तर मोहम्मद शमी, टीम साउदी आणि वनिंदू हसरंगा हे प्रत्येकी ५ विकेट्सह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.