IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली. लखनौच्या दीपक हुडा व आयूष बदोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने १५९ धावांचे लक्ष्य उभे केले. हार्दिक व मॅथ्यू वेडने गुजरातला विजयाच्या मार्गावर ठेवले होते, परंतु दोघंही लागोपाठ माघारी परतले. लखनौचे पारडे जड वाटत असताना राहुल तेवातिया ( Rahul Tewatia) डेव्हिड मिलरसह बाजी पलटवली. या दोघांनी ३४ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिनव मनोहरने सामना संपवला. गुजरातला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला.
मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) तीन विकेट्स घेत लखनौची अवस्था ४ बाद २९ अशी केली होती. कर्णधार लोकेश राहुल ( ०) , क्विंटन डी कॉक ( ७), एव्हिन लुईस ( १०) व मनीष पांडे ( ६) हे झटपट माघार परतले. हुडा व बदोनी यांनी लखनौच्या डावाला आकार दिला आणि ६८ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. हुडा ४१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करून माघारी परतला. शमीने ४ षटकांत २५ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. शमीने टाकलेल्या १८व्या षटकात बदोनीने १५ धावा कुटल्या. बदोनीने षटकार खेचून पदार्पणातील अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३८ चेंडूंत ही खेळी साकारली. त्याने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. LSG ने ६ बाद १५८ धावा केल्या.