IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : २१० धावा केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते.. त्यात मोहसिन खानने ( Mohsin Khan) कोलकाता नाईट रायडर्सला तीन मोठे धक्के दिले. पण, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा निर्धार करूनच KKRचा संघ मैदानावर उतरला... श्रेयस अय्यर, नितिश राणा व सॅम बिलिंग्स यांनी तुफान फटकेबाजी केली. मात्र, पुन्हा KKRची गाडी घसरली. रिंकू सिंग व सुनील नरीन यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत सामना केला... एव्हिन लुईसने तो झेल टिपला नसता तर कोलकाता प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहिले असते... या थरारक विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर व KKRचा माजी कर्णधार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे...
लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक या जोडीने २० षटकांत २१० धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. क्विंटन ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर, तर लोकेश ५१ चेंडूत ६८ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात KKRची सुरुवात निराशाजनक झाली. वेंकटेश अय्यर ( ०) व अभिजित तोमर ( ४) यांची विकेट मोहसिन खानने घेतली. २ बाद ९ अशा अवस्थेत असणाऱ्या KKRला नितिश राणा ( ४२) व कर्णधार श्रेयस अय्यर ( ५०) यांनी सावरले. अय्यर व राणाने २७ चेंडूंत ५६ धावा चोपल्या. त्यानंतर अय्यर व सॅम बिलिंग्स ( ३६) यांनी ४० चेंडूंत ६६ धावा चोपल्या. आंद्रे रसेल ( ५) लगेच माघारी परतला.
सुनील नरीन व रिंकू सिंग यांची तुफान फटकेबाजी KKR ला आशेचा किरण दाखवणारी ठरली. या दोघांनी १९ चेंडूंत ५८ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात २१ धावा असताना रिंकूने ४, ६ ,६, २ अशी सुरूवात केली. २ चेंडूंत ३ धावा हव्या असताना रिंकूने जोरदार फटका मारला आणि एव्हिन लुईसने एका हाताने तितक्याच चतुराईने तो टिपला. रिंकू १५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारासह ४० धावांवर बाद झाला. स्टॉयनिसने अखेरच्या चेंडूवर उमेश यादवची विकेट घेत लखनौला २ धावांनी सामना जिंकून दिला. कोलकाताने ८ बाद २०८ धावा केल्या.
१९.४ षटकापर्यंत डग आऊटमध्ये शांत बसलेला गौतम गंभीर लुईसच्या कॅचनंतर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसला. त्यात स्टॉयनिसने शेवटच्या चेंडूवर उमेश यादवची विकेट घेताच त्याने जोरदार सेलिब्रेशन केले. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Web Title: IPL 2022 LSG vs KKR Live Update : Aggression and reaction of Gautam Gambhir when Lucknow Super Giants won the match, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.