IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचे ४ फलंदाज २४ धावांवर माघारी परतले. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना सामन्यावर पकड घेतली. पण, आंद्रे रसेल ( Andre Russell) आला अन् वादळी खेळी करायला लागला. जेसन होल्डरच्या एका षटकात तर त्याने २४ धावा कुटल्या. तो मैदानावर असेपर्यंत कोलकाताला पुनरागमनाच्या आशा होत्या, परंतु आवेश खानने ( Avesh Khan) ही महत्त्वाची विकेट घेतली.
लखनौला पहिल्याच षटकात कर्णधार लोकेश राहुलची विकेट गेल्याने धक्का बसला, परंतु कोलकाताला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. क्विंटन डी कॉकचे अर्धशतक व दीपक हुडा यांनी LSGचा मजबूत पाया उभा केला. क्विंटन व दीपक हुडा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. क्विंटनने २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५० धावा केल्या. दीपक २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ४१ धावांवर अय्यरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यावर कृणाल पांड्या (२५) , मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी यांनी धावांचा डोंगर उभा केला. मार्कस स्टॉयनिस १४ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जेसन होल्डरने अखेरच्या दोन चेंडूवर षटकार खेचले. शिवम मावीच्या त्या षटकात ३० धावा चोपल्या. होल्डर ४ चेंडूंत १३ धावा करून माघारी परतला. टीम साऊदीने २०व्या षटकात चांगली गोलंदाजी केली. लखनौला ४ धावाच दिल्या. लखनौने ७ बाद १७६ धावा केल्या. बदोनी १५ धावांवर नाबाद राहिला.
मोहसिन खान, दुष्मंथा चमिरा, जेसन होल्डर आणि आवेश खान या जलदगती गोलंदाजांनी KKRचे कंबरडे मोडले. मोहसिनने आग ओकणारी गोलंदाजी करताना पहिल्या षटकात KKRच्या बाबा अपराजितला (०) माघारी जाण्यास भाग पाडले. मोहसिनने ते षटक निर्धाव टाकले. त्यानंतर चमिरा, होल्डर, आवेश यांनी अनुक्रमे श्रेयस अय्यर ( ६), आरोन फिंच ( १४) व नितिश राणा (२) यांना बाद करून KKRची अवस्था ४ बाद २५ अशी केली. आंद्रे रसेलवरच आता सर्व भिस्त होती आणि १० धावांवर असताना रवी बिश्नोईने झेल सोडून त्याला जीवदानही दिले. जेसन होल्डरने टाकलेल्या त्या ९व्या षटकात रसेलने ६, ६, २, ६, ४ अशा २४ धावा कुटल्या. रिंकू सिंगसोबत कुटलेल्या २६ चेंडूंत ४४ धावांत रसेलचा ३९ धावांचा वाटा होता. बिश्नोईने KKRला धक्का देताना रिंकूला ( ६) बाद केले.
पुढच्याच चेंडूवर सुनील नरीनच्या बॅटची किनार घेत चेंडू स्लिपच्या दिशेने गेला, परंतु जेसन होल्डर थोडा दूर असल्याने चेंडू टप्पा खाऊन त्याच्या हाती गेला. त्यानंतर नरीनने खणखणीत षटकार अन् चौकार खेचला. १३व्या षटकात आवेश खानचा पहिला चेंडू षटकार खेचून रसेलने KKRच्या चाहत्यांना आनंदीत केले, परंतु पुढच्याच चेंडूवर जेसन होल्डरने त्याचा अप्रतिम झेल टिपला. रसेल १९ चेंडूंत ४५ धावांवर बाद झाला आणि त्याच्या या खेळीत ३ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. चौथ्या चेंडूवर अनुकूल रॉय ( ०) हाही बाद झाला. (पाहा IPL 2022 - LSG vs KKR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)
पाहा व्हिडीओ...