IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : जोस बटलर अपयशी ठरला असला तरी राजस्थान रॉयल्सचा ( RR ) डाव यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल व संजू सॅमसन यांनी सावरला. रवी बिश्नोईने २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. RR ने लखनौ सुपर जायंट्ससमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत राजस्थान रॉयल्सला चांगली सुरुवात करता आलेली नाही. आयपीएल २०२२मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी असलेला जोस बटलर ( Jos Buttler) पुन्हा अपयशी ठरला. आवेश खानने ( Avesh Khan) पुन्हा त्याला बळीचा बकरा बनवताना त्रिफळा उडवला. यशस्वी जैस्वालने पहिल्या षटकात दोन चौकार खेचून सुरुवात चांगली केली, परंतु मोहसिन खान व आवेश खान यांनी त्यांच्या धावांवर अंकुश ठेवले. तिसऱ्या षटकात आवेशच्या गोलंदाजीवर उलटा फटका मारण्याच्या प्रयत्नात जोसने त्रिफळा उडवून घेतला. बटलर आज २ धावांवर बाद झाला आणि आयपीएल २०२२मधील ही त्याची निचांक कामगिरी ठरली.
यशस्वीने एक बाजूने फटकेबाजी सुरू ठेवली. दुष्मंथा चमिराला मारलेला षटकात हा स्टेडियमबाहेर गेला. RR ने पॉवर प्लेमध्ये १ बाद ५५ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन आज जबाबदारीने खेळणे अपेक्षित होते आणि त्याने सुरुवात तर तशी केली होती. पण, पुन्हा एकदा चुकीचा फटका मारून तो बाद झाला. संजूने दुसऱ्या विकेटसाठी यशस्वीसह ४० चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. संजूने ६ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूंत ३२ धावा केल्या. आयुष बदोनीने सुरेख रिटर्न कॅच घेताना यशस्वीचे वादळ माघारी पाठवले. यशस्वीने २९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४१ धावा केल्या. रवी बिश्नोईने १४व्या षटकात देवदत्त पडिक्कलची ( ३९ धावा, १८ चेंडू) विकेट घेतली.