IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : ३ बाद २९ अशी अवस्था असताना लखनौ सुपर जायंट्सच्या मदतीला कृणाल पांड्या ( Krunal Panday ) व दीपक हुडा ही जोडी धावली. त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण, आर अश्विनच्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. जोस बटलर व रियान पराग या दोघांनी मिळून कृणालचा अविश्वसनीय झेल टिपला आणि लखनौला मोठा धक्का दिला.
१७८ धावांच्या प्रत्युत्तरात, लखनौ सुपर जायंट्सला ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात दोन धक्के दिले. क्विंटन ड कॉक ( ७) चा सुरेख झेल निशॅमने घेतला आणि पुढच्याच चेंडूवर आयुष बदोनीला ( ०) LBW केले. बोल्टची हॅटट्रिक हुकली, परंतु LSG ला मोठे धक्के बसले. LBW विरोधात बदोनीने घेतलेला DRS ही वाया गेला. ६व्या षटकात LSGला मोठा धक्का बसला. प्रसिद्ध कृष्णाच्या त्या षटकात पहिलाच चेंडू लोकेश राहुलने अगदी सहजतेने सीमापार पाठवला. पण, तिसऱ्या चेंडूवर प्रसिद्धने LSGच्या कर्णधाराला पॉईंटच्या दिशेने खेळण्यास भाग पाडले आणि जैस्वालने सुरेख झेल टिपला. लोकेश १० धावांवर बाद झाला आणि लखनौची अवस्था ३ बाद २९ अशी झाली.
दीपक हुडा व कृणाल पांड्या यांनी लखनौच्या डावाला आकार देताना ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांचा खेळ पाहून RRच्या क्षेत्ररक्षकांचे मनोबल ढासळत चालले होते आणि त्यांच्याकडून चुका होत गेल्या. पण, जोस बटलरने प्रसांगवधान राखताना ही चूक सुधारली आणि LSGला मोठा धक्का दिला. आर अश्विनच्या गोलंदाजीवर कृणालने लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत फटका मारला. चेंडू सीमारेषेपार जातोय असे दिसताना बटलरने तो टिपला आणि तोल जाण्यापूर्वी लगेच तो रियान परागकडे फेकला. रियानने चेंडू झेलून कृणालला माघारी जाण्यास भाग पाडले. कृणाल ( २५) व दीपक यांची ६५ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
जोस बटलर ( २) लगेच माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. संजूने ६ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूंत ३२ धावा केल्या. यशस्वीने २९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४१ धावा केल्या. रवी बिश्नोईने १४व्या षटकात देवदत्त पडिक्कलची ( ३९ धावा, १८ चेंडू) विकेट घेतली. रियान पराग व जिमी निशॅम यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण, बिश्नोईच्या गोलंदाजीवर परागचा ( १९) अप्रतिम झेल मार्कस स्टॉयनिसने टिपला. त्याच षटकात आर अश्विन व निशॅम यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवला आणि निशॅमला ( १४) धावबाद होऊन माघारी जावे लागले. ट्रेंट बोल्ट ( १७*) व अश्विन ( १०*) यांनी राजस्थानला ६ बाद १७८ धावा उभ्या करून दिल्या.