IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने ( RR) रविवारी लखनौ सुपर जायंट्सवर ( LSG) दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत मोठे फेरबदल केले. राजस्थानच्या १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने कडवी झुंज दिली होती, परंतु जोस बटलर व रियान पराग या जोडीने घेतलेली कॅच टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर लखनौचा डाव गडगडला. RRच्या यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांनी सुरेख फलंदाजी केली. ( पाहा IPL 2022 - LSG vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड ) राजस्थानच्या खात्यात आता १६ गुण झाले आहेत आणि ते दुसऱ्या क्रमांकावर सरकले आहेत.
१७८ धावांच्या प्रत्युत्तरात लखनौला ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात दोन धक्के दिले. क्विंटन ड कॉक ( ७) व आयुष बदोनी ( ०) सलग दोन चेंडूंवर बाद झाले. प्रसिद्ध कृष्णाने पुढील षटकात LSGचा कर्णधार लोकेश राहुलला ( १०) बाद केले. दीपक हुडा व कृणाल पांड्या यांनी लखनौच्या डावाला आकार दिला. पण, जोस बटलरने प्रसांगवधान राखताना ही जोडी तोडली. आर अश्विनच्या गोलंदाजीवर कृणालने लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत फटका मारला. चेंडू सीमारेषेपार जातोय असे दिसताना बटलरने तो टिपला आणि तोल जाण्यापूर्वी लगेच तो रियान परागकडे फेकला. रियानने चेंडू झेलून कृणालला माघारी जाण्यास भाग पाडले. कृणाल ( २५) व दीपक यांची ६५ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
जोस बटलर ( २) लगेच माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. संजूने ६ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूंत ३२ धावा केल्या. यशस्वीने २९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४१ धावा केल्या. रवी बिश्नोईने १४व्या षटकात देवदत्त पडिक्कलची ( ३९ धावा, १८ चेंडू) विकेट घेतली. रियान पराग व जिमी निशॅम यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण, बिश्नोईच्या गोलंदाजीवर परागचा ( १९) अप्रतिम झेल मार्कस स्टॉयनिसने टिपला. त्याच षटकात आर अश्विन व निशॅम यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवला आणि निशॅमला ( १४) धावबाद होऊन माघारी जावे लागले. ट्रेंट बोल्ट ( १७*) व अश्विन ( १०*) यांनी राजस्थानला ६ बाद १७८ धावा उभ्या करून दिल्या.