IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दोन बदल करताना रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व कुलदीप सेन यांना यशस्वी जैस्वाल व नवदीप सैनीच्या जागी एन्ट्री दिली. राजस्थानची कोसळणारी नौका आर अश्विन व शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) यांनी किनाऱ्यावर सुखरूप पोहोचवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. हेटमायरने दणदणीत अर्धशतक झळकावत अखेरच्या तीन षटकांत Sixers चा पाऊस पाडला.
लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यशस्वी जैस्वालच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कल व जोस बटलर यांनी RRच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. देवदत्तला मैदानावरील पंचांनी LBW आऊट दिले, परंतु RRच्या सलामीवीराने DRS घेतला अन् त्यात चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला घासून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर देवदत्तने तुफान फटकेबाजी केली. पण, बटलर १३ धावांवर बाद झाला. आवेश खानने त्याच्या पहिल्याच षटकात त्याचा त्रिफळा उडवला. संजू सॅमसन व देवदत्त डाव सावरतील असे वाटत असताना लोकेशने गोलंदाजीसाठी जेसन होल्डरला आणले आणि त्याने RRच्या कर्णधार सॅमसनला ( १३) LBW केले.
त्यानंतर कृष्णप्पा गौथमने ( Krishnappa Gowtham) एकाच षटकात दोन धक्के दिले. सेट झालेल्या देवदत्तला ( २९) त्याने चुकीचा फटका मारण्यास भाग पाडून झेलबाद केले आणि त्यानंतर रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनला ( ४) त्रिफळाचीत केले. राजस्थानची अवस्था ४ बाद ६७ अशी झाली. आर अश्विन व शिमरोन हेटमायरने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संयमी खेळ केला. १८व्या षटकात हेटमायरने गिअर बदलला आणि जेसन होल्डरच्या त्या षटकात १८ धावा कुटल्या.
१९व्या षटकात आर अश्विन ( २८) रिटायर्ड आऊट झाला आणि रियान पराग मैदानावर आला. हेटमायरने आवेश खानला दोन खणखणीत षटकार खेचून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रियान ४ चेंडूंत ८ धावा करून माघारी परतला, तर हेटमायर ३६ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने ६ बाद १५६ धावा केल्या.