Why KL Rahul leave Punjab Kings?; भारतीय संघाचा फलंदाज आणि आयपीएल २०२२ नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) संघाचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) नव्या प्रवासाला सुरूवात करत आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात तो LSG ला पहिल्याच प्रयत्नात जेतेपद जिंकून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. लोकेश राहुल मागील चार वर्ष पंजाब किंग्सकडून आयपीएल खेळला आणि २०१८ ते २०२१ या कालावधीत तो PBSK कडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ५५ सामन्यांत ५४.९च्या सरासरीने २५४८ धावा केल्या आहेत.
मागील दोन पर्व लोकेश राहुल हा पंजाब संघाचा कर्णधार होता आणि त्यातही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली. दोन्ही पर्वात ६००+ धावा करूनही तो २०१४च्या उप विजेत्या पंजाब किंग्सला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकला नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही लोकेश राहुलने पंजाब किंग्स संघ सोडण्याचा निर्णय घेतला. मेगा ऑक्शनपूर्वी लखनौ सुपर जायंट्सने त्याला १७ कोटींत करारबद्ध केले आणि कर्णधारही बनवले.
पंजाब किंग्स संघ सोडण्याचा निर्णय हा तितका सोपा नव्हता, असे मत लोकेशने व्यक्त केले. तो म्हणाला, चार वर्ष मी या संघासोबत होतो आणि त्यांच्याकडून माझी कामगिरीही सातत्यपूर्ण झाली होती. पण, मला स्वतःला शोधायचे होते आणि नवं आव्हान समोर आल्यास आणखी चांगली कामगिरी करता येते का याची चाचपणी करायची होती. हा निर्णय घेणे सोपं नक्की नव्हते. पंजाब किंग्स संघासोबत ऋणानुबंध जुळले होते. पण, मला काहीतरी नवीन करायचे होते.