मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाला (IPL 2022) २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे चाहते उत्साहात आहेत. मात्र त्याआधीच चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२२ प्रेक्षकांशिवाय खेळवली जाण्याची शक्यता आहे. २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत आयपीएलची सुरुवात होईल अशी चर्चा झाली होती. मात्र आता ही परवानगी ठाकरे सरकार मागे घेण्याची शक्यता आहे. आज तकनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेच्या सूचनाकेंद्र सरकारनं राज्य सरकारला कोविड-१९ च्या नव्या धोक्याची जाणीव करून देत सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा परिणाम आयपीएलवर होऊ शकतो. आम्हाला केंद्र सरकारकडून याबद्दल एक पत्र मिळाल्याचं आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी सांगितलं. 'युरोपियन देश, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागानं एक पत्र जारी करून योग्य पावलं उचलण्यास सांगितलं आहे. आयपीएलच्या सामन्यांवर मला आता काही बोलता येणार नाही,' असं टोपे म्हणाले.
आयपीएल २०२२ चे सर्व साखळी सामने महाराष्ट्रात होणार आहेत. मुंबई आणि पुण्यात ७० सामने खेळवले जातील. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि राज्य सरकारनं सामन्यांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थित राहतील अशी योजना आखली होती. मात्र आता ही योजना रद्द होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाता येणार नाही.
आयपीएल २०२१ ला कोरोनाचा फटका बसला होता. आयपीएलचा मागील हंगाम एप्रिलमध्ये भारतात सुरू झाला. मात्र अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं हंगाम मध्येच थांबवावा लागला. त्यानंतर काही महिन्यांनंतर संयुक्त अरब अमिरातमध्ये उर्वरित सामने खेळवले गेले.