Join us  

IPL 2022 : बस्स झालं!; वानखेडे स्टेडियमवर आता IPL चे आणखी सामने नकोत; BCCIकडे केली गेली सामने हलवण्याची मागणी, जाणून घ्या कारण

IPL 2022, Wankhede Stadium : आतापर्यंत ७०पैकी ४७ सामने झाले आहेत. पण, आता वानखेडे स्टेडियमवरील सामने हटवण्याची मागणी होताना दिसत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 5:29 PM

Open in App

IPL 2022, Wankhede Stadium : इंडियन प्रीमिअर लीगच्या साखळी फेरीतील सामने २२ मे २०२२ ला संपणार आहेत. कोरोना परिस्थिती डोळ्यासमोर ठेऊन आयपीएल २०२२च्या साखळी फेरीचे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे खेळवण्याचा निर्णय झाला. आतापर्यंत ७०पैकी ४७ सामने झाले आहेत. पण, आता वानखेडे स्टेडियमवरील सामने हटवण्याची मागणी होताना दिसत आहे. बस्स झालं, आता वानखेडे स्टेडियमवर आणखी आयपीएलचे सामने नकोत, असा पवित्रा स्टेडियममधील गरवारे क्लबने ( Garware Club ) घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. गरवारे क्लबने या मागणीचे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशन व BCCI ला पाठवले असून त्यात वानखेडेवरील सामने कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या सामन्यांमुळे मुंबई पोलिसांनी स्टेडियमवर जाण्यासाठी कठोर नियम बनवले आहेत आणि त्यामुळे गरवारे क्लबच्या सदस्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा त्यांना आर्थिक फटकाही बसत असल्याचे समजतेय...''आयपीएल सामन्यांमुळे मुंबई पोलिसांनी क्लब सदस्य, बोनाफाईड पाहुणे, वेंडर्स यांच्यासाठी अनेक नियमांची अट ठेवली आहे. त्यामुळे आमच्या सदस्यांची गैरसोय होते. परिणामी क्लब हाऊसला आर्थिक फटका बसत आहे,''असे गरवारे क्लबचे उपाध्यक्ष राज पुरोहित यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते. 

आयपीएलच्या वेळापत्रकानुसार वानखेडेवर २० सामन्यांचे आजोजन करण्यात येणार होते, परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे काही सामने वानखेडेवर शिफ्ट केले गेले.  आतापर्यंत १३ सामने खेळवण्यात आले आहेत आणि ८ सामने अजूनही शिल्लक आहेत. यासंदर्भात आता बीसीसीआय स्थानिक क्रिकेट संघटना व महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. पण, सध्यातरी वानखेडेवरील सामने दुसरीकडे हलवण्याची कोणतीच शक्यता नाही. 

वानखेडे स्टेडियमवरील उर्वरित सामने

  • ७ मे - पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • ८ मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • १२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १५ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • १७ मे  - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १९ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २१ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २१ मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयमुंबई पोलीस
Open in App